ऑलिम्पिक पात्रता फेरी – नेमबाज विजयवीर सिद्धूने जिंकलं रौप्यपदक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानी नेमबाज विजयवीर सिद्धू याने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेच्या पात्रता फेरीत 25 मीटर रॅपिड फायर स्पर्धेत रौप्य पदक पटकावलं आहे. या पदकासोबतच त्याने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेचा 17 वा कोटा मिळवला आहे. विशेष म्हणजे आजवरच्या इतिहासात हिंदुस्थानचे 17 नेमबाज कधीही ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी झाले नव्हते.

जकार्ता येथे सुरू असलेल्या आशिया ऑलिम्पिक पात्रता फेरीत आज सहापैकी चार फायनलिस्ट थेट ऑलिम्पिक कोटा पटकावणार होते. वास्तविक विजयवीरला ऑलिम्पिक कोटा मिळवण्यासाठी पदक जिंकण्याची गरज नव्हती. त्याचा फायनलसाठीच्या अंतिम चार खेळाडूंमध्ये समावेश झाल्यानंतर त्याने ऑलिम्पिक कोटा जिंकला. त्याने 577 गुणांसह अंतिम चार खेळाडूंमध्ये स्थान पटकावले. त्याने बाद फेरीत 28 राऊंड फायर करत रौप्य पदकावर आपलं नाव कोरलं. या स्पर्धेत आतापर्यंत हिंदुस्थानच्या चार नेमबाजांनी पॅरिस ऑलिम्पिक कोटा जिंकला आहे. यात इशा सिंग, वरून तोमर, रिदम सांगवान, विजयवीर या नेमबाजांचा समावेश आहे.