
देखणे व्यक्तिमत्त्व, भारदस्त आवाज, जबरदस्त अभिनय यांची देणगी विक्रम गोखले यांना लाभली होती. त्यांनी अभिनयाने आपला चाहतावर्ग निर्माण केला. आपल्या बोलक्या अभिनयाने विक्रम गोखले यांनी नाटक, चित्रपटांमधील अनेक भूमिका अजरामर केल्या. ‘बॅरिस्टर’ नाटकातील अभिनयाने त्यांना प्रसिद्धीच्या शिखरावर नेले. तब्बल आठ वर्षे ‘बॅरिस्टर’चे प्रयोग केले. ‘तुझेच मी गीत गात आहे’ या ‘स्टार प्रवाह’वरील मालिकेत त्यांनी अखेरचे काम केले. नुकताच प्रदर्शित झालेला ‘गोदावरी’ हा त्यांचा अखेरचा चित्रपट ठरला.
विक्रम गोखले यांचा जन्म 30 ऑक्टोबर 1947 रोजी पुण्यात झाला. गोखले यांना अभिनयाचा वारसा कुटुंबातूनच मिळाला. अभिनय क्षेत्रात त्यांच्या कुटुंबातील चार पिढय़ांचे मोठे योगदान राहिले आहे. घरातून वारसा मिळाला तरी त्यांची खास स्वतंत्र ओळख होती. परखड व्यक्तिमत्त्व म्हणूनही ते ओळखले जायचे. त्यांच्या पणजी दुर्गाबाई कामत या चित्रपटसृष्टीतील पहिल्या अभिनेत्री होत्या. 1913 मध्ये दुर्गाबाईंनी दादासाहेब फाळके यांची निर्मिती आणि दिग्दर्शन असलेल्या ‘मोहिनी भस्मासुर’ नावाच्या चित्रपटात ‘पार्वती’ची आणि विक्रम गोखले यांच्या आजी कमलाबाई कामत यांनी ‘मोहिनी’ची भूमिका साकारली होती. विक्रम गोखले यांचे वडील चंद्रकांत गोखले यांनी अनेक हिंदी-मराठी चित्रपटांतून भूमिका केल्या होत्या.
विक्रम गोखले मालिका, नाटक आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमांत कार्यरत होते. गोखले यांनी इंडस्ट्रीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. त्यांनी त्यांच्या कारकीर्दीत अनेक सुपरहिट चित्रपट दिले. संजय लीला भन्साळी यांच्या ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटात ते ऐश्वर्याच्या वडिलांच्या भूमिकेत दिसले. याशिवाय ते ‘भूलभुलैया’, ‘दिल से’, ‘दाना दान’, ‘हिचकी’, ‘निकम्मा’, ‘अग्निपथ’ अशा चित्रपटांत त्यांनी काम केले होते. ‘भिंगरी’, ‘माहेरची साडी’, ‘लपंडाव’, ‘वासुदेव बळवंत फडके’, ‘सिद्धान्त’ हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत. अभिनयासोबतच त्यांनी लेखन आणि दिग्दर्शनदेखील केले आहे. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘आघात’ या चित्रपटाचे समीक्षकांनी विशेष कौतुक केले. 2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अनुमती’ या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
‘बॅरिस्टर’ नाटकातून खरी ओळख मिळाली
विक्रम गोखले यांना खरी ओळख आहे ती ‘बॅरिस्टर’ या नाटकापासून. जयवंत दळवी लिखित आणि विजया मेहता दिग्दर्शित हे नाटक मराठी नाटकांमधील एक दर्जेदार नाटक म्हणून मानले जाते. मानवी नातेसंबंधांची अनोखी बाजू या नाटकाने मांडली. ‘बॅरिस्टर’ या नाटकात विक्रम गोखले आणि त्यांचे वडील चंद्रकांत गोखले यांनी एकत्र काम केले होते.
चाहत्यांच्या पत्रांना द्यायचे उत्तर
विक्रम गोखले 25 वर्षांपूर्वी आपल्या चाहत्यांच्या प्रत्येक पत्राला उत्तर देत असत. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की, 25 वर्षांपूर्वी पत्र लिहिण्याची मी स्वत:ला सवय लावून घेतली होती. येणाऱ्या चाहत्यांच्या प्रत्येक पत्राला उत्तर देणारा म्हणून मी ख्यातकीर्त होतो, असे त्यांनी सांगितले होते.
अभिनयासोबत जपली सामाजिक बांधिलकी
अभिनय क्षेत्रात दमदार कामगिरी करतानादेखील त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली. आपण व्यक्ती म्हणून समाजाचे काही देणे लागतो ही वडिलांची शिकवण त्यांनी आयुष्यभर पाळली. विक्रम गोखले यांनी ‘कमलाबाई गोखले पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट’तर्फे दिव्यांग सैनिक आणि समाजातील उपेक्षितांसाठी गेली कित्येक वर्षे ते काम करत होते. कलाकारांच्या वृद्धाश्रमांसाठी त्यांनी पुढाकार घेऊन मुळशी तालुक्यातील नाणेगाव येथील आपली दोन एकर जमीन दान केली. ते ‘सिंटा’ अर्थात सिने आणि टेलिव्हिजन कलाकारांच्या संघटनेच्या अध्यक्षपदी होते. ‘सिंटा’च्या माध्यमातून त्यांनी वेळोवेळी कलावंतांच्या प्रश्नाला वाचा पह्डली.
छोटा पडदाही गाजवला
विक्रम गोखले यांनी टेलिव्हिजनमध्येही एक वेगळी ओळख निर्माण केली होती. 1989 ते 1991 या काळात दूरदर्शनवर चाललेल्या ‘उड़ान’ या प्रसिद्ध मालिकेतही त्यांनी काम केले होते. ‘विरुद्ध’ या मालिकेतील ‘धीरेंद्रराय सिंघानिया’ या त्यांनी साकारलेल्या भूमिकेची खूप चर्चा झाली. ‘श्वेतांबरा’, ‘जीवनसाथी’, ‘संजीवनी’, ‘जुनून’, ‘मेरा नाम करेगी रोशन’ या हिंदी मालिकांसह ‘या सुखांनो या’, ‘अग्निहोत्र’ या मराठी मालिकांमध्येही त्यांनी अभिनय केला. ‘अवरोध’ आणि ‘आंबेडकर-द लिजेंड’ या वेब सीरिजमध्ये त्यांनी काम केले होते. काही दिवसांपूर्वीच ते ‘स्टार प्रवाह’वरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत गुरू पंडित मुकुल नारायण या भूमिकेत झळकले होते. ही त्यांची शेवटची मालिका ठरली.
विविध पुरस्कारांनी गौरव
विक्रम गोखले यांना संगीत नाटक अकादमी (2012), ‘अनुमती’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार (2013), विष्णूदास भावे जीवनगौरव (2015), हरिभाऊ साने जीवनगौरव (2017), चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव (2017), चित्रभूषण पुरस्कार (2019) अशा विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते.
हिंदी, मराठी चित्रपटांत दमदार भूमिका
मराठीसह हिंदी चित्रपटांत विक्रम गोखले यांनी साकारलेल्या भूमिका विशेष गाजल्या. ‘बाळा गाऊ कशी अंगाई’, ‘कळत नकळत’ आणि ‘माहेरची साडी’, ‘पुंकू’, ‘मुक्ता’, ‘लपंडाव’, ‘वऱहाडी आणि वाजंत्री’, ‘बिजली’, ‘आधारस्तंभ’, ‘सावरखेड एक गाव’, ‘अनुमती’, ‘नॉट ऑन्ली मिसेस राऊत’, ‘दुसरी गोष्ट’ अशा अनेक चित्रपटांत त्यांनी ठसा उमटवला. ‘नटसम्राट’मध्ये नाना पाटेकर यांच्यासोबतची त्यांची जुगलबंदी गाजली. ‘वजीर’ चित्रपटासाठी त्यांना ‘फिल्म फेअर’ मिळाले, तर त्यांनी डॉक्टरी पेशावर आधारित कथेवर ‘आघात’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या पहिल्याच चित्रपटासाठी त्यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला.
हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांनी स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. ‘इन्साफ’, ‘खुदा गवाह’, ‘हम दिल दे चुके सनम’, ‘हे राम’, ‘भुलभुलैया’, ‘मदहोशी’, ‘तुम बिन’, ‘चॅम्पियन’, ‘लाडला’, ‘हसते हसते’, ‘शाम घनश्याम’, ‘अग्निपथ’, ‘ईश्वर’, ‘सलीम लंगडे पे मत रो’, ‘मिशन मंगल’, ‘कुछ तुम कहो, कुछ हम कहें’, ‘गफला’, ‘धुवाँ’ अशी कितीतरी चित्रपटांची नावे घेता येतील. ‘एबी आणि सीडी’ चित्रपटात समोर महानायक अमिताभसारखा मोठा नट आला तरी त्यांचा अभिनय झाकोळला गेला नाही. त्यांची महत्त्वाची भूमिका असलेला ‘गोदावरी’ हा चित्रपट अलीकडेच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाआधी विक्रम गोखले रुग्णालयात दाखल होते. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच त्यांनी ‘गोदावरी’चे शूटिंग केले.
रंगभूमीशी अतूट निष्ठा
विक्रम गोखले यांना बाळ कोल्हटर यांच्या नाटकात काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर रंगभूमीवरील त्यांच्या प्रवासाला सुरुवात झाली. त्यांचे गाजलेले पहिले व्यावसायिक नाटक म्हणजे ‘स्वामी.’ यात त्यांनी माधवराव पेशव्यांची ऐतिहासिक भूमिका साकारली. पुढे ‘अपराध मीच केला’, ‘वेगळं व्हायचंय मला’, ‘जास्वंदी’, ‘महासागर’, ‘जावई माझा भला’, ‘दुसरा सामना’ ‘आणि मकरंद राजाध्यक्ष’, ‘खरं सांगायचं तर’, ‘नकळत सारे घडले’ अशा अनेक नाटकांतून त्यांच्या दमदार अभिनयाची जादू प्रेक्षकांना अनुभवता आली. ‘संकेत मिलनाचा’ या नाटकाच्या माध्यमातून त्यांनी दिग्दर्शनात पाऊल टाकले. ‘आप्पा आणि बाप्पा’ या विनोदी नाटकातील दिलीप प्रभावळकर यांच्यासोबतची त्यांची जुगलबंदी विशेष गाजली.
घशाच्या त्रासामुळे रंगभूमीला अलविदा
2016 साली विक्रम गोखले ‘के दिल अभी भरा नही’ या नाटकाद्वारे मराठी रंगभूमीवर प्रेक्षकांच्या भेटीला आले होते, परंतु घशाचा त्रास झाल्यामुळे त्यांनी या नाटकाचे केवळ 74 प्रयोग करून रंगभूमीला अलविदा केले.
ते स्वप्न अधुरेच राहिले
विक्रम गोखले यांच्या निधनानंतर रत्नागिरीत चित्रित झालेल्या ‘सोहळा’ चित्रपटाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. आठवडाभर रत्नागिरीमध्ये थांबून त्यांनी ‘सोहळा’ चित्रपटाचे चित्रीकरण केले होते. यावेळी रत्नागिरीच्या निसर्गसौंदर्याच्या प्रेमात ते पडले. रत्नागिरीत आणखी एक चित्रपट करण्याची त्यांची इच्छा होती. त्या दृष्टीने तयारी सुरू झाली होती, मात्र हे स्वप्न अधुरेच राहिले.
बोलका पॉझ हे अभिनयाचे वैशिष्टय़
‘पॉझ वकि&ंग’साठी विक्रम गोखले यांची विशेष ओळख सांगितली जाते. योग्य ठिकाणी पॉझ घेतल्यावर तुम्हाला शब्दांची गरज पडत नाही. ती शांतता खूप काही सांगून जात असे त्यांनी अभिनय प्रशिक्षण शिबिरात सांगितले होते. आपल्या अभिनय प्रशिक्षण शिबिराद्वारे त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम केले.
























































