विक्रम लँडर चंद्रावर उतरताना आपटला होता, नासाने दाखवले फोटो

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानचा महत्त्वाकांक्षी अवकाश प्रकल्प असलेलं चांद्रयान-2 चंद्रावर उतरताना आपटल्याचं उघड झालं आहे. नासाने काही फोटो जाहीर केले असून त्यात चंद्राच्या पृष्ठभागावर जिथे विक्रमचं हार्ड लँडिंग झालं होतं, तो भाग दिसत आहे.

विक्रमने एका समतल जागी उतरण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तो असफल ठरला. 7 सप्टेंबर रोजी संपर्क तुटल्यानंतर विक्रम चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करणार होता. हिंदुस्थानचा हा सॉफ्ट लँडिंगचा पहिला प्रयत्न होता. मात्र, विक्रमचा संपर्क तुटल्यानंतर तो चंद्राच्या भूमीवर आपटला होता. 17 सप्टेंबर रोजी नासाचा एक उपग्रह तिथून जात होता, तेव्हा त्याने विक्रम उतरला त्या प्रदेशाची छायाचित्रं घेतली. अर्थात त्यावरून विक्रमच्या निश्चित स्थानाबाबत माहिती मिळालेली नाही. समतल पृष्ठभागावर उतरण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरल्याने विक्रमच्या अचूक लोकेशनची माहिती कळू शकलेली नाही.

यानंतर आता नासा 14 ऑक्टोबर रोजी पुन्हा एकदा विक्रमला शोधायचा प्रयत्न करणार आहे. विक्रम पृष्ठभूमीवर जिथे उतरला असेल, तिथे धुकेसदृश्य स्थितीमुळे दिसणं कठीण आहे. 14 ऑक्टोबर रोजी प्रकाश किरणांची स्थिती अधिक चांगली असणार आहे. त्या प्रकाशात विक्रमचा शोध घेणं शक्य होऊ शकेल, असा अंदाज नासाने वर्तवला आहे.