
जिल्ह परिषद निवडणुकीच्या प्रचार सभेत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या १०० कोटी रुपयांच्या निधीतून रत्नागिरी जिल्हा परिषदेची इमारत उभी राहिली असा दावा केला होता. त्यांच्या या थापेबाजीचा शिवसेना जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव यांनी खरपूस समाचार घेतला. इमारतीच्या भूमिपूजनाचे जुने व्हिडिओ दाखवत हा निधी अजित पवारांना दिला असे सांगितले व सामंत यांच्या थापाबाजीचा भांडाफोड केला.
विक्रांत जाधव यांनी सांगितले की, मी जिल्हा परिषद अध्यक्ष असताना रत्नागिरी जिल्हा परिषदेचा प्रस्ताव तयार करून माझे वडील आमदार भास्कर जाधव यांच्यासोबत तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन निधीची मागणी केली होती.त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निधी उपलब्ध करून दिला होता. इमारतीच्या भूमिपुजनाच्या कार्यक्रमात तत्कालीन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांच्या प्रयत्नातून इमारत उभी रहात असल्याचे सांगितले होते, त्याचा व्हिडिओ जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव यांनी व्हायरल केला आहे.
पुढे जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव यांनी सांगितले की, इमारतीसाठी निधी कमी पडत होता तेव्हा पुन्हा आम्ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटलो आणि वाढीव निधीची मागणी केली होती. ती मागणी मान्य करत आम्हाला वाढीव निधी दिला. आज इमारतीसाठी ७५ कोटी रुपये निधी आला आहे असे विक्रांत जाधव यांनी सांगितले.
”आज रत्नागिरी जिल्हा परिषदेची जी इमारत उभी राहिली आहे, ती माझ्या मागणीचा आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याचा परिणाम आहे. ही इमारत म्हणजे केवळ भिंतींचा समूह नसून, माझ्या प्रयत्नांची आणि विकासासाठीच्या बांधिलकीची साक्ष आहे.म्हणूनच म्हणतात “सत्य परेशान हो सकता है पराजित नही”, असे विक्रांत जाधव म्हणाले.




























































