तमाच्या तळाशी दिवे लागले, विक्रोळीत दिव्यांग बनवताहेत पणत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. बाजारपेठांमध्ये कंदील, पणत्या, रांगोळी, दिव्यांची तोरणं आदींचे स्टॉल सजू लागले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून कारागीर या कामांमध्ये व्यस्त होते. यामध्ये दिव्यांग व्यक्ती तरी कशा मागे राहतील? विक्रोळीच्या कन्नमवार नगरमधील पालिका शाळेत दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दिव्यांगांची लगबग दिसून येत आहे. त्यांनी या वर्षी सुमारे 25 हजार आकर्षक आणि डिझाईनच्या पणत्या तयार केल्या आहेत. त्यांच्या कष्टाचे दिवे घरोघरी उजळणार आहेत.

1987 साली विक्रोळीत नॅशनल असोसिएशन ऑफ डिसेबल्ड्स एंटरप्रायझेस या नेत्रहीन, दिव्यांगांसाठी काम करणाऱया संस्थेची स्थापना झाली. संस्थेमार्फत नेत्रहीन, दिव्यांगांना कौशल्यपूर्ण प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून दिला जातो. कागदी, कापडी पिशव्या तयार करणे, छत्री बनवणे, स्टेशनरीच्या वस्तू तयार करणे असे काही उपक्रम संस्थेतर्फे राबविले जातात. सध्या दिव्यांग व्यक्तींनी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आकर्षक पणत्या, दिवे बनवले आले आहेत. या कामी ज्यांना ऐकू-बोलता येत नाही, शारीरिक व्यंग असलेले तसेच गतिमंद व्यक्ती अशा 25 जणांचे हात लागले आहेत. अत्यंत कल्पकतेने, आकर्षक रंगसंगतीचा वापर करून या मातीच्या पणत्या बनवल्या आहेत. ऑगस्ट महिन्यापासून हे काम सुरू आहे. दरवर्षी विविध ठिकाणी स्टॉल उभारून आणि ऑनलाइन माध्यमातून पणत्यांची विक्री केली. त्यांना खूप चांगली मागणी असते. लॉकडाऊनमुळे पणत्या तयार करण्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून कमी झाले आहे. यंदा संस्थेने फारसे स्टॉल लावलेले नाहीत.

– मातीच्या पणत्या, दिवे बनविण्याचे काम 25 दिव्यांग व्यक्तींनी केले आहे. त्यांना या कामातून साधारण 4 ते 5 हजारांचा रोजगार मिळतो.
– संस्थेतर्फे लॉक डाऊनच्या आधी सिद्धिविनायक मंदिर, महालक्ष्मी मंदिर, हिरानंदानी यांसारख्या ठिकाणी पणत्यांची विक्री केली जायची. मात्र यंदा अद्याप स्टॉल लावलेले नाहीत. ऑनलाइन माध्यमातूनदेखील पणत्यांची विक्री केली जात आहे.

नॅशनल असोसिएशन ऑफ डिसेबल्ड्स एंटरप्रायझेस या संस्थेचे विक्रोळीत कन्नमवार नगर पालिका शाळा तसेच टागोर नगर आणि कन्नमवार नगर 2 येथे वर्कशॉप आहे. तिथे पणत्यांसह अन्य वस्तू बनवण्याचे काम चालते. दरवर्षी संस्थेतर्फे साधारण 10 लाख रुपयांपर्यंतच्या वस्तूंची विक्री होते. यंदा मात्र ही विक्री अर्ध्यावर येईल.
z के. एन. राधाकृष्णन नायर, संस्थापक, नॅशनल असोसिएशन ऑफ डिसेबल्ड्स एंटरप्रायझेस