टागोर नगरमध्ये आजपासून कबड्डीची पकडापकडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विक्रोळी पूर्वेला टागोर नगर मित्र मंडळ आयोजित जिल्हास्तरीय पुरुष व महिला कबड्डी स्पर्धेची जोरदार पकडापकडी थरार पाहायला मिळणार आहे. 1 ते 4 एप्रिलदरम्यान  साई मंदिराशेजारील मैदानावर कबड्डीच्या चढाया-पकडींचा हा थरार अनुभवायला मिळणार आहे. पुरुष गटात उद्घाटनाचा सामना यंगस्टार विरुद्ध शूर जवान, तर महिला गटात सत्यम विरुद्ध एम.आय.ई.एस. यांच्यात रंगेल.

या स्पर्धेत एकूण 19 पुरुष आणि 9 महिला संघ सहभागी होत असून प्रत्येक संघ जेतेपदासाठीच मैदानात चढाई करणार आहे. त्यामुळे या स्पर्धेत आक्रमक चढाया, भक्कम पकडी आणि थरारक क्षणांची मेजवानी कबड्डीप्रेमींना चाखायला मिळेल. स्पर्धेत पारितोषिकांचीही लयलूट केली जाणार असून पुरुष विजेत्यांना 15 हजारांचे बक्षीस दिले जाईल. स्पर्धेत अन्य रोख पुरस्कारही दिले जाणार असून उत्कृष्ट पंचगिरी करणाऱया पंचाचाही सन्मान केला जाणार असल्याची माहिती आयोजक गिरीश पवार यांनी दिली.

पुरुष गटात जॉली, यंगस्टार, शूर जवान, गुरुदत्त, नवरत्न घाटकोपर, नवरत्न विक्रोळी, शितलादेवी, साईसेवा, सत्यम, उत्कर्ष, चेंबूर क्रीडा पेंद्र, सक्षम, अंबिका, मुलुंड क्रीडा, जय लहुजी, जय भवानी, जाणता राजा आणि ओवळी हे संघ बाद फेरीत खेळतील.