
विलेपार्ले पूर्व येथे आज उत्तुंग इमारतीच्या तेराव्या मजल्यावर भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत 63 वर्षीय महिलेचा होरपळून मृत्यू झाला असून एक 34 वर्षीय महिला जखमी झाली आहे.
विलेपार्लेच्या फिरोजशहा मेहता रोडवरील सुविधा पर्ल इमारतीच्या 13 व्या मजल्यावर सकाळी 9.51 वाजता आगीची ठिणगी पडली. इलेक्ट्रिक वायरिंग डक्टमधून ही आग लागल्यानंतर काही वेळातच भडकली. आगीची माहिती मिळताच पालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी तातडीने धाव घेत बचावकार्य सुरू केले. मात्र आग सर्वात वरच्या मजल्यावर लागल्याने धुराचे लोळ कॉरिडॉर आणि जिन्यावर पसरले. त्यामुळे अग्निशमन दलाला बचावकार्य करताना कसरत करावी लागली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे 5 फायर इंजिन, 2 जम्बो टँकर, 2 एरियल वॉटर टॉवर टेंडर आणि हायड्रोलिक प्लॅटर्फाम, आवश्यक मनुष्यबळ तैनात करण्यात आले होते. दुपारी 1.44 वाजता आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले. या इमारतीत आग नक्की कशामुळे लागली याची तपासणी पोलीस आणि अग्निशमन यंत्रणेकडून सुरू आहे.
सुदैवाने दोन महिला बचावल्या
आग लागलेल्या मजल्यावर असणाऱ्या दोन महिलांना अग्निशमन दलाने सुखरूप बाहेर काढल्याने त्यांचा जीव वाचला. आगीतून बाहेर काढताना या दोन्ही बेशुद्ध अवस्थेत होत्या. भावना सत्रा (63) आणि अनेरी (34) अशी त्यांची नावे आहेत. त्यांना तातडीने नानावटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.






























































