
सर्वसामान्यांचे सरकारी कार्यालयांतील खेटे कमी करण्याबरोबरच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून भूमी आलेखन विभागात पारदर्शकता आणण्यात येणार आहे. त्याचबरोबर गावठाणांची हद्द निश्चित करण्यासाठी ड्रोनद्वारे मोजणी करण्यात येत आहे. जनसामान्यांशी निगडित असलेली महसूल विभागातील कामे अतिशय सुटसुटीतपणे करण्याच्या दृष्टीने महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीला महसूल राज्यमंत्री अब्दुल नबी सत्तार उपस्थित होते.
महसूल विभागाच्या कामकाजात पारदर्शकता आणून जनजीवन सुसह्य व्हावे यासाठी ऑनलाइन प्रणालीचा वापर वाढविण्यावर अधिक भर देण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले. यापूर्वी महसूलमंत्री असताना सातबारा ऑनलाइन करण्याची प्रक्रिया सुरू केली होती ती प्रक्रिया आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. बदलत्या आवश्यकतेनुसार कामकाजाच्या पद्धतीत बदल करण्याची आवश्यकता आहे. भूमीहक्क अधिनियमात काही सुधारणा प्रस्तावित आहेत. यावरही येत्या मार्चपर्यंत निर्णय घेऊन यातही अधिक सुसूत्रता आणावी अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.























































