मराठवाडा विद्यालयास ग्रामस्थांनी लावले कुलूप

642

पालक व ग्रामस्थांनी शाळा इमारत बांधकामाची वारंवार मागणी केली तरी संस्थाचालक केवळ आश्वासने देऊन वेळ मारुन नेत असल्याने अखेर संतप्त ग्रामस्थांनी चेरा (ता .जळकोट) येथील मराठवाडा विद्यालय या शाळेस कुलूप ठोकले आहे. ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार चेरा येथे 1999-2000 मध्ये मराठवाडा विद्यालयाची स्थापन करण्यात आली असून पूर्ण शाळा लोखंडी पत्र्यांच्या शेडमध्ये आहे. संस्थेचे संस्थाचालक भरत बापूसाहेब देशमुख आहेत आणि मुख्याध्यापक सचिन देशमुख हे आहेत.

शाळा सुरु होऊन 19 वर्षे झाली आहेत. आता शाळेची दूरवस्था झाली आहे. शाळा पत्र्यांची असल्यामुळे उन्हाचे प्रमाण वाढल्याने तापलेल्या वातावरणामुळे साप मुलांच्या बाकाखाली येऊन बसतात. सरपंच व उपसरपंच विजय माने हे वेळोवेळी संस्था चालकाशी बोलून शाळा इमारत बांधकामाची मागणी करीत आहेत. त्यावर एक महिन्यात बांधकाम सुरू करणार आहोत, असे संस्थाचालक सांगून वेळ मारून नते आहेत. 15 ऑगस्ट रोजी सर्व गावकऱ्यांनी बैठक घेऊन संस्थाचालकांशी चर्चा केली. त्यावेळी देशमुख यांनी सांगितले की, आम्ही 17 सप्टेंबर रोजी शाळेचे भूमिपूजन करणार आहोत आणि नाही केले तर 18 सप्टेंबरला शाळेला टाळे ठोका, असे आश्वासन दिले होते. त्यांनी हे आश्वासन पाळले नसल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी उपसरपंच विजय माने, सर्व ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील घुमनवाड यांच्यासह मंगळवारी संस्था बंद करण्याचा निर्णय घेतला आणि शाळेला कुलूप लावले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या