
कर्जत तालुक्यातील कडाव टाटा पॉवर कॅम्पजवळील भिवपुरी परिसरात उभारण्यात येणाऱ्या टाटा पॉवर कंपनीच्या एक हजार मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पाला स्थानिक ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला आहे. हा प्रकल्प स्थानिकांच्या मुळावर उठणारा असून रोजगाराबाबत कंपनीने कोणताही ठोस आराखडा तयार केला नसल्याचा आरोप करत या प्रकल्पाला ग्रामस्थांनी विरोध केल 1 आहे. येत्या ६ ऑक्टोबरपासून नागरिकांनी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
टाटा पॉवरच्या माध्यमातून भिवपुरी परिसरात एक हजार मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प उभा करण्यात येणार आहे. या प्रकल्पाला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने मंजुरीही दिली आहे. ही मंजुरी देताना शासनाने पर्यावरणाचा होणारा ऱ्हास आणि स्थानिक भूमिपुत्रांच्या मागण्यांचा विचार केलेला नाही. कंपनीकडून स्थानिक ग्रामस्थांना मिळणारा रोजगार, उद्योग सेवा, पायाभूत सुविधा याबाबत कोणताही ठोस आराखडा तयार केलेला नाही. फक्त कंपनीचे हित लक्षात घेऊन मंजुरी देण्यात आली आहे असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
हा प्रकल्प स्थानिकांच्या मुळावर उठणारा असल्याने आदिवासी महादेव कोळी समाजोन्नती मंडळ कर्जत, आदिवासी समन्वय समिती कर्जत तालुका, ऑर्गनायझेशन फॉर राईटस ऑफ ट्रायबल जिल्हा शाखा रायगड यांच्यासह नऊ संघटनांनी या प्रकल्पाला विरोध केला आहे.
कंपनीने जर तातडीने स्थानिकांना रोजगाराची हमी, पर्यावरणीय परिणामांवर ठोस उपाययोजना, तसेच समाजाभिमुख योजना जाहीर केल्या नाहीत तर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येणार असल्याची भूमिकाही ग्रामस्थांनी घेतली आहे. या विरोधात ६ ऑक्टोबरपासून उपोषणाचा इशारा दिला आहे.