
दूरदर्शनवर गाजलेल्या गजरा या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरात पोहचलेले प्रसिद्ध जेष्ठ निर्माते विनायक चासकर यांचे ठाण्यात वृद्धापकाळाने निधन झाले. ते 83 वर्षांचे होते. त्यांची निर्मिती असलेल्या ‘स्मृतीचित्रे’ या कार्यक्रमाला तसेच ‘आश्रित’ या नाटकाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते.
मुंबई दूरदर्शनच्या स्थापनेपासून विनायक चासकर तेथे कार्यरत होते. दिल्लीच्या राष्ट्रीय नाट्य विद्यालयामधून पदवी घेतल्यानंतर ते मुंबई दूरदर्शन केंद्रावर निर्माते म्हणून रुजू झाले. त्यांनी मराठी नाट्यविभाग, विविध रंजन मंच, चित्रपट समालोचन इत्यादी विभाग सांभाळले. त्यांनी अनेक लोकप्रिय कार्यक्रमांची निर्मिती केली होती. त्यापैकी ‘गजरा’ हा त्यांचा सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रम ठरला. 80 पेक्षा अधिक भाग प्रसारीत झालेल्या या कार्यक्रमातून लक्ष्मीकांत बेर्डे, दिलीप प्रभावळकर, किशोर प्रधान, शोभा प्रधान, शं. ना. नवरे, रत्नाकर मतकरी, सुमती गुप्ते, विनय आपटे, सुरेश खरे इत्यादी मराठी चित्रपटसृष्टीतले आघाडीचे अनेक कलाकार लोकप्रिय झाले होते.



























































