
राज्यातील नेत्यांचे फोन टॅपिंग केल्याप्रकरणी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याविरोधात आरोपपत्र नुकतंच दाखल झालं. याबाबत प्रसारमाध्यमांनी खासदार विनायक राऊत यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी या प्रकरणासाठी देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार धरले आहे. टीव्ही 9 शी बोलताना
”ज्याने हे फोन टॅपिंग केले आहे त्यांना कडक शिक्षा झालीच पाहिजे. रश्मी शुक्ला यांनी हे काहीही स्वत: केलेलं नाही. त्यांचा बोलविता धनी हे तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. त्यांच्या सांगण्यावरूनच फोन टॅपिंग करण्यात आले आहे”, अशा शब्दात विनायक राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.
बेकायदेशीरपणे राज्यातील राजकीय नेत्यांचे फोन टॅपिंग केल्याप्रकरणी कुलाबा पोलिसांनी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याविरोधात किल्ला कोर्टात आरोपपत्र दाखल केले. या 700 पानी आरोपपत्रात शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनाथ खडसे यांच्यासह 20 साक्षीदारांच्या साक्षी आणि पुराव्यांची नोंद आहे. साक्षीदारांमध्ये बहुतांश हे सरकारी कर्मचारी आहेत. त्यात तत्कालीन अतिरिक्त गृह सचिव एस. कुमार आणि राज्य गुप्तहेर विभागातील वरिष्ठ अधिकाऱयाचाही समावेश आहे.




























































