नौदल दिनानिमित्त, महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग (मालवण-राजकोट) किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावर देशाला समर्पित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाचे सोमवारी 26 ऑगस्ट 2024 रोजी नुकसान झाले. या घटनेमुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशवासीयांच्या मनात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. याच दुर्घटनाग्रस्त पुतळय़ाच्या ठिकाणी महाविकास आघाडीचे नेते पाहणीसाठी गेले असता भाजप, खासदार नारायण राणे यांनी घरात घुसून सर्वांना ठार मारणार असे बेताल वक्तव्य केले. विशेष म्हणजे पोलीस अधीक्षकांच्या उपस्थितीत असे वक्तव्य केल्याने त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी विनंती शिवसेना नेते खासदार विनायक राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.
माजी खासदार विनायक राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेल्या पत्रात असे नमूद केले आहे की, मालवण-राजकोट येथील छत्रपती शिवरायांचा पुतळा दुर्घटनाग्रस्त झाला, याप्रश्नी बुधवार, 28 ऑगस्ट रोजी मालवण शहरात जनतेच्या वतीने उत्स्फूर्तपणे बंदचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार वैभव नाईक, आमदार राजन साळवी आणि मी स्वतः घटनेचा आढावा घेण्यासाठी गेलो होतो.
सिंधुदुर्ग जिह्याचे पोलीस अधीक्षक यांनी खासदार नारायण राणे यांना आदित्य ठाकरे आणि आलेल्या ज्येष्ठ लोकप्रतिनिधींची माहिती दिली होती. त्याचवेळी भाजप खासदार नारायण राणे, त्यांचे पुत्र नीलेश राणे व त्यांचे गुंड समर्थक राजकोट येथे पोहोचले. त्यांनी ‘घरात घुसून सर्वांना ठार मारणार’ असे शब्द शिवप्रेमी जनतेला आणि लोकप्रतिनिधींना टीव्ही कॅमेऱयांसमोर आणि पोलिसांच्या उपस्थितीत वापरले. यावेळी त्यांनी पत्रकाराशी केलेल्या झटापटीची घटना सर्व टीव्ही चॅनलने मांडली आहे.
अत्यंत निंदनीय आणि गंभीर वक्तव्य
खासदार नारायण राणे आणि नीलेश राणे यांचा पूर्वीचा इतिहास पाहिला तर त्यांच्या स्वभावात हिंसा आणि अविचार आहेत. माजी खासदार असूनही मला जिवे मारण्याची धमकी देणाऱया खासदार नारायण राणे यांच्यावर तत्काळ पोलीस कारवाई झाली पाहिजे. या अत्यंत गंभीर व निंदनीय बाबीकडे आपण लक्ष देऊन खासदार नारायण राणे यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी, जेणेकरून देशातील जनतेच्या मनात एक उत्तम व तत्पर प्रशासक म्हणून तुमची प्रतिमा कायम राहावी तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या हौतात्म्य स्थळाची प्रतिष्ठा राखण्याची तुमची ओढ अधोरेखित होईल अशी विनंती माजी खासदार राऊत यांनी लेखी पत्राद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे.