‘खेलरत्न’ अन् ‘अर्जुन’ पुरस्कार परत करणार; आता विनेश फोगाटचीही ‘दंगल’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रीय कुस्ती महासंघाच्या निवडणुकीनंतर हिंदुस्थानी कुस्तीमध्ये सुरू असलेली कुस्तीपटू आणि संघटक यांच्यात सुरू असलेली दंगल थांबता थांबणार नाही. आधी साक्षी मलिकची तडकाफडकी निवृत्ता, नंतर बजरंग पुनियाचा ‘पद्मश्री’ पुरस्कार परत करण्याचा डाव आणि आता देशाला अनेक पदके जिंकून देणारी ‘गोल्डन गर्ल’ विनेश फोगाटने आपले ‘खेलरत्न’ आणि ‘अर्जुन’ पुरस्कार परत करण्याच्या केलेल्या घोषणेने हिंदुस्थानी क्रीडा क्षेत्रात खळबळ माजवली आहे. तिने आज आक्रमक पवित्रा घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक खरमरीत पत्र लिहून ‘मला ‘मेजर ध्यानचंद खेलरत्न’ आणि ‘अर्जुन’ हे दोन पुरस्कार परत करायचे आहेत,’ असे कळविले आहे.

विनेश फोगाटने पंतप्रधानांना दोन पानी लिहिलेले पत्र सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे. ‘मी माझा ‘मेजर ध्यानचंद खेलरत्न’ आणि ‘अर्जुन’ पुरस्कार परत करत आहे. आम्हाला या परिस्थितीत पोहचवणाऱया शक्तिशाली व्यक्तीचे खूप खूप आभार’ असे कॅप्शन देत भाजपचे खासदार व अनेक वर्षे राष्ट्रीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष राहिलेल्या बृजभूषण शरण सिंह यांना सणसणीत टोला लगावला.

आमची पदकाची किंमत 15 रुपये काय?

आमची पदकं आणि पुरस्कार यांची किंमत 15 रुपये आहे, असे बृजभूषण बिनधास्त सांगतात, मात्र ही पदके आम्हाला जीवाहून प्रिय आहेत. आम्ही पदकं जिंकली तेव्हा देशभरात आमचा गौरव झाला होता, मात्र आम्ही आमच्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्याचा प्रयत्न करतोय तर आम्हाला देशद्रोही ठरविले जात आहे. पंतप्रधानजी, आम्ही देशद्रोही आहोत काय? असा सवालही विनेशने केला.

त्या व्यक्तीची मीडियातील भाषा ऐका!
विनेश फोगाट हिने पत्रात मोदींना एक विनंतीही केली. ‘तुम्ही पाच मिनिटे वेळ काढून महिलांचे शोषण करणारे बृजभूषण शरण सिंह मीडियासमोर आमची किती अवहेलना करतात, कुठल्या भाषेत बोलतात ती भाषा तुम्ही एकदा ऐकाच. महिला कुस्तीपटूंचा अपमान करण्याची एकही संधी त्या व्यक्तीने सोडलेली नाही. एवढेच नाही, तर त्या व्यक्तीने किती तरी महिला कुस्तीपटूंचा आवाज दाबलेला आहे हे त्याहून अधिक गंभीर होय, असेही तिने सांगितले.

महिला खेळाडू फक्त सरकारी जाहिरातीवर छापण्यासाठीच काय?
विनेशने पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात मोदी सरकारचे पार वाभाडे काढले. ‘मला आठवतंय की, 2016 च्या ऑलिम्पिकमध्ये साक्षी मलिकने पदक जिंकल्यावर तिला तुमच्या सरकारने ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’चा ब्रॅण्ड अॅम्बेसेडर बनवले होते, मात्र आज त्याच साक्षीला कुस्ती सोडायला लागली. तेव्हापासूनच मला 2016 चं ते वर्ष आठवतंय. आम्ही फक्त सरकारी जाहिरातींवर छापण्यासाठीच महिला खेळाडू झालो आहोत काय?’, असा जळजळीत सवालही तिने पंतप्रधानांना विचारला. ‘कुस्तीतील गलिच्छ प्रकारामुळेच माझेही ऑलिम्पिक पदक जिंकण्याचे स्वप्न धुसर होत चालले आहे. आमचे स्वप्न भविष्यात आगामी महिला कुस्तीपटूंकडून पूर्ण होवो हीच देवाकडे मी प्रार्थना करेन, असेही ती म्हणाली.