
महाकुंभ मेळ्यादरम्यान आपल्या विवाहामुळे चर्चेत आलेली मध्य प्रदेशची ‘व्हायरल गर्ल’ मोनालिसाचे लग्न वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या (NCST) चौकशी अहवालात मोनालिसा लग्नाच्या वेळी अल्पवयीन असल्याचे धक्कादायक सत्य समोर आले असून, याप्रकरणी तिचा पती फरमान खान याच्यावर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एफआयआर दाखल झाल्यामुळे आता फरमानवर अटकेची टांगती तलवार निर्माण झाली आहे.
पारधी जमातीतील असलेल्या मोनालिसाचा विवाह 11 मार्च 2026 रोजी केरळमध्ये पार पडला होता. या विवाहाबाबत संशय व्यक्त करत वकील प्रथम दुबे यांनी 17 मार्च 2026 रोजी राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाकडे धाव घेतली होती. या तक्रारीची दखल घेत आयोगाच्या तपास पथकाने केरळपासून ते महेश्वरपर्यंतच्या सर्व कागदपत्रांची बारकाईने पडताळणी केली. या तपासात सर्वात मोठा पुरावा महेश्वर येथील सामुदायिक आरोग्य केंद्रातून मिळाला. येथील अधिकृत नोंदीनुसार मोनालिसाची जन्मतारीख 30 डिसेंबर 2009 अशी आहे, ज्याचा अर्थ विवाहाच्या वेळी तिचे वय अवघे 16 वर्षे होते. तपास पथकाने केरळमध्ये सादर केलेल्या विवाह नोंदणीच्या प्रमाणपत्रातही मोठी तफावत असल्याचे शोधून काढले असून, ही कागदपत्रे रद्द करण्याची शिफारस केली आहे.
आयोगाच्या या कडक भूमिकेनंतर महेश्वर पोलीस ठाण्यात फरमान खानविरुद्ध अपहरण आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या (पॉक्सो) विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. इंदूर रेंजचे आयजी अनुराग यांनी या कारवाईला दुजोरा दिला असून प्रकरणाच्या प्रत्येक पैलूचा सखोल तपास सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे. या प्रक्रियेत कायद्याचा फास फरमानवर अधिक आवळला जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, या प्रकरणाला आता राजकीय आणि सामाजिक वळणही प्राप्त झाले आहे. या विवाहाचे आयोजन करणाऱ्या आणि त्यास पाठिंबा देणाऱ्या काही संघटना तसेच राजकीय व्यक्तींच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. व्हायरल प्रसिद्धीच्या झगमगाटात पार पडलेल्या या विवाहामागील कायदेशीर त्रुटी उघड झाल्यामुळे आता प्रशासकीय यंत्रणांनी याकडे गांभीर्याने लक्ष दिले आहे. आयोग आणि पोलिसांच्या अंतिम अहवालानंतर या प्रकरणातील अनेक बाबी समोर येण्याची चिन्हे आहेत.



























































