नितीश कुमारांच्या राज्यात 12 कोटी रुपये खर्चून उभारलेला एक पूल उद्घाटनाआधीच कोसळल्यामुळे खळबळ उडाली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला असून, डबल इंजिन सरकारचे हे बघा फायदे, असे म्हणत लोकांनी भाजप आणि नीतीश कुमार यांच्या एकूणच कारभारावर निशाणा साधला आहे.
अररिया जिह्यातील बाकरा नदीवर पडरिया घाट परिसरात हा पूल उभारण्यात आला होता. वाहतूक सुरू होण्यापूर्वीच अचानक कोसळलेला हा पूल नदीतळाशी विसावला आहे. 182 मीटर लांबीच्या पुलाचे बांधकाम 2021 मध्ये सुरू झाले होते. पुलाच्या बांधकामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आले होते, असे आरोप लोकांनी केले आहेत. अररियाचे खासदार प्रदीपकुमार सिंह आणि सिक्टीचे भाजप आमदार विजय कुमार मंडल यांनी ठेकेदार व संबंधित अधिकाऱयांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
पुलावर जाण्यासाठी रस्ताच नव्हता
प्रधानमंत्री ग्राम सडक निर्माण योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या या पुलाची किंमत आधी 7.79 कोटी रुपये होती. मात्र नंतर नदीचा मार्ग आणि अॅप्रोच रोड बदलल्याने एकूण खर्च 12 कोटी रुपये झाला. पूल जून 2023 मध्ये पूर्ण झाला, पण पुलावर जाण्यासाठी दोन्ही बाजूला रस्तेच नसल्यामुळे त्यावरून वाहतूक होत नव्हती. गेल्या दोन दिवसांपासून पुलाच्या स्लॅबला भेगा पडल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मंगळवारी हा पूल अचानक कोसळला. हा पूल केंद्र सरकारच्या ग्रामीण बांधकाम विभागांतर्गत शेजारच्या किशनगंज जिह्यातील सिराजुर रहमान या ठेकेदाराने बांधला आहे.