
पालघर जिल्ह्याचा जलदगतीने कायापालट व्हावा याकरिता विरार-डहाणू उपनगरीय रेल्वे ट्रॅकच्या चौपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र या प्रकल्पाला ‘तारीख पे तारीख’ मिळत असल्याने १० वर्षे झाली तरी हा प्रकल्प अद्याप पूर्ण झालेला नाही. यासाठी ३ हजार ५०० कोटी रुपयांहून अधिक निधी मंजूर आहे. परंतु भूसंपादन आणि कांदळवन तोडणी लांबल्याने हा प्रकल्प रखडला आहे.
पश्चिम रेल्वेच्या एमयूटीपी ३ अंतर्गत विरार ते डहाणू या एकूण ६३ किमी अंतराच्या रेल्वे मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम २०१६ साली मंजूर करण्यात आले होते. मार्च २०२२ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र भूसंपादन आणि कांदळवन तोडणी करण्यासाठी मंजुरी मिळण्यास खूप उशीर झाल्याने संपूर्ण प्रकल्पच रेंगाळला आहे. डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेने अनेक वेळा मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या कार्यालयात जाऊन कामाचा आढावा घेतला. माहिती अधिकारात हा प्रकल्प २०२२, २०२३, २०२४ मध्ये पूर्ण होईल, अशी माहिती मिळाली आहे.
आतापर्यंत ४७ टक्के काम पूर्ण
२०१६ ते २०२६ या १० वर्षांत फक्त ४७ टक्के काम पूर्ण झाल्याने संताप व्यक्त होत आहे. मग ५३ टक्के काम पूर्ण होणार तरी केव्हा, असा सवाल प्रवाशांनी केला आहे. विरार-डहाणू चौपदरीकरण प्रकल्पाचा कालावधी लांबला आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या लोप्रतिनिधींनी डहाणू लोकलच्या फेऱ्या वाढवण्यासाठी आणि १५ डब्यांच्या लोकल सुरू करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेचे सचिव दयानंद पाटील यांनी सांगितले.

























































