माझे सर्व करंडक आईकडेच! – विराट कोहली

माझ्या कारकीर्दीत जिंकलेल्या सर्व ट्रॉफी मी आईकडे पाठवल्या आहेत. विराट कोहलीचे हे शब्द केवळ विधान नाही, तर त्यामागे दडलेली भावना, कृतज्ञता आणि मातृऋणाची जाणीव आहे. न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या वन डेत 28 हजार आंतरराष्ट्रीय धावांचा ऐतिहासिक टप्पा पार केल्यानंतर विराटने मैदानाबाहेरही चाहत्यांची मने जिंकली, ती आपल्या आईविषयी व्यक्त केलेल्या या भावनिक कबुलीने.

हिंदुस्थानच्या क्रिकेट इतिहासात सर्वात वेगाने 28,000 धावा पूर्ण करणारा विराट हा दुसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. 624 व्या डावात हा पराक्रम करत त्याने सचिन तेंडुलकर आणि कुमार संगकारा यांनाही मागे टाकले. मात्र या विक्रमांपेक्षा विराटला अधिक अभिमान आहे ते आपल्या आईचे.

माझी आई गुरुग्राममध्ये राहते. तिला ट्रॉफी, सन्मान, पुरस्कार जवळ ठेवायला फार आवडतात. म्हणून मी जिंकलेली प्रत्येक ट्रॉफी तिच्याकडेच पाठवली आहे,’ असे विराटने सांगितले. हे शब्द सांगत असताना त्याच्या चेहऱयावर अभिमान होता, पण डोळय़ांत कृतज्ञतेची झलक स्पष्ट दिसत होती. आपल्या प्रवासात आईने दिलेले बळ, त्याग आणि शांत पाठिंबा याची परतफेड म्हणूनच हे सगळे सन्मान आईच्या चरणी अर्पण करत असल्याचे म्हणाला.

मैदानावर दबावातही शांत राहणारा विराट आता माइलस्टोनचा विचार करत नाही. माझा पह्कस फक्त सामना आणि संघाच्या विजयावर असतो, असे सांगत त्याने 91 चेंडूंत केलेल्या 93 धावांच्या निर्णायक खेळीमागची मानसिकता उलगडली.