
हिंदुस्थानी खेळाडूंनी ओव्हलवर कमाल केली आणि हातातून निसटलेला सामना जिंकत पाच सामन्यांची मालिका 2-2 अशी बरोबरीत सोडवली. मोहम्मद सिराजने इंग्लंडचा शेवटचा फलंदाज बाद करत अवघा देश आनंदी झाला. या लढतीत एकूण 9 विकेट्स घेणाऱ्या सिराजचे देश-विदेशातील चाहत्यांनी कौतुक केले. टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली यानेही ओव्हलवरील विजयानंतर पहिली प्रतिक्रिया देत आरसीबीचा माजी सहकारी सिराजचे तोंड भरून कौतुक केले.
हिंदुस्थानने शानदार विजयाची नोंद केली. सिराज आणि प्रसिध कृष्णाच्या चिकाटीने, जिद्दीने संघाने हा थरारक विजय मिळवला. विशेषत: मोहम्मद सिराज याचे कौतुक. तो संघासाठी सर्वस्व पणाला लावायला कायमच तयार असतो. त्याच्यासाठी मला आज खूप आनंद होत आहे, असे विराट कोहली म्हणाला. या पोस्टसोबत त्याने पुढे हार्टचा इमोजीही टाकला.
विराट कोहली याच्या पोस्टला मोहम्मद सिराज यानेही उत्तर दिले आहे. माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल धन्यावाद भाऊ! असे सिराजने विराट कोहलीला उद्देशून म्हटले आहे.
Thank you bhaiya for “Believe”ing in me ❤️ https://t.co/TBWmOMzqmX
— Mohammed Siraj (@mdsirajofficial) August 4, 2025
दरम्यान, ओव्हल कसोटीच्या अखेरच्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी 35 तर हिंदुस्थानला 4 विकेट्सची गरज होती. हिंदुस्थानच्या तरुण खेळाडूंनी अशक्य ते शक्य करून दाखवत इंग्लंडचा 6 धावांनी पराभव केला. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या हिंदुस्थानच्या संघाने ही मालिकाही बरोबरीत सोडवली. सिराजने अखेरच्या दिवशी इंग्लंडच्या 3 विकेट्स घेत मोलाची कामगिरी बजावली. संपूर्ण लढतीत त्याने 9 विकेट्स घेतल्या. याबद्दल त्याला सामनावीर पुरस्कार देऊनही गौरवण्यात आले.