कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन चालकाच्या मुलाच्या आईच्या रक्ताचा डीएनए अहवाल पोलिसांच्या हाती आला असून, तिनेच ते रक्त दिल्याचे स्पष्ट झाले असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. याप्रकरणी कटात सहभागी असलेल्या डॉक्टरांसह शिपायाला अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांनी 7 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे, तर मुलाची आई शिवानी आणि वडील विशाल अगरवाल यांना 10 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मुलाचे आई-वडील यांनी कट रचून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. आरोपी यांनी कशाप्रकारे गुह्याचा कट रचला, याबाबत एकत्रित तपास करायचा आहे. सायबर तज्ञांच्या मदतीने आरोपीचे मोबाईल विश्लेषण सुरू असून, नवीन पुरावे समोर येत आहेत. आरोपींची साखळी स्पष्ट होण्यासाठी त्यांची सात दिवसांची पोलीस कोठडी आवश्यक असल्याचे वकिलांनी न्यायालयात सांगितले, तर युक्तिवाद करताना बचाव पक्षाचे वकील म्हणाले, ‘ज्या दिवशी अपघात घडला तेव्हा डॉ. तावरे हा डय़ुटीवर नव्हता. त्यामुळे त्याचा या प्रकरणाशी काही संबंध नाही. एकमेकांसमोर चौकशी करायची आहे, हा कोठडी मागण्याचा मुद्दा असू शकत नाही. यापूर्वीच मोबाईल जप्ती, घर तपासणी झालेली आहे.’
– बुधवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास डॉ. तावरे, डॉ. हाळनोर, घटकांबळे, तसेच अगरवाल दाम्पत्य अशा पाच जणांना व्ही. आर. कचरे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी ससून रुग्णालयात डॉक्टरांनी घेतलेले रक्त हे मुलाच्या आईचे असल्याचे फॉरेन्सिक अहवालावरून स्पष्ट झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.