
आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपुरामध्ये भाविकांनी गर्दी केली आहे. सावळ्या विठूरायाच्या दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. याच दर्शन रांगेमध्ये एका वृद्ध वारकऱ्याचा हृदय विकाराचा झटका आल्याने जागीच मृत्यू झाला. बुधवारी रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली.
भगवान घनश्याम भोसले (वय – 76, रा. विटा) असे मृत भाविकाचे नाव आहे. ते विठ्ठलाच्या दर्शन रांगेमध्ये उभे होते. विठूरायापासून ते दोनशे पावले दूर असतानाच त्यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आला.
पंढरपुरामध्ये वारीची गर्दी असल्याने विठूरायाच्या पदस्पर्श दर्शनासाठी 4 ते 5 तासांचा वेळ लागत आहे. विठूचा धावा करीत विणे गल्लीतील उड्डाण पुलावर पोहचल्यानंतर भगवान भोसले हे दर्शन रांगेत अचानक कोसळले. रांगेत पुढे-मागे उभ्या असलेल्या लोकांनी त्यांना रांगेबाहेर काढत वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र गर्दी जास्त असल्याने त्यांना तात्काळ मदत मिळाली नाही. अखेर उपचारासाठी दवाखान्यात दाखल करेपर्यंत त्यांचा मृत्यू झाला.
ही घटना बुधवारी रात्री आठच्या सुमारास घडली. यावेळी देवाला लिंबू पाण्याचा नैवैद्य दाखविण्यासाठी दर्शन व्यवस्था काही वेळ बंद ठेवावी लागते. नेमके याच वेळी भगवान भोसले या वारकऱ्याला काळाने गाठले. देवाच्या दर्शनासाठी या भाविकाला फार तर आणखी अर्धा तासांचा अवधी लागला असता. मात्र देवाचे दर्शन घेण्यापूर्वी काळाने झडप घातली. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.
























































