
मुंबईत गणेशमूर्तींच्या विसर्जनानंतर 24 तासांच्या आत कृत्रिम तलाव आणि नैसर्गिक स्रोतांमधील मूर्ती बाहेर काढून निर्माल्याचा पुनर्वापर केला जाणार आहे. यासाठी पालिकेने आयआयटी, मुंबईसह व्हीजेटीआयसारख्या संस्थांना तंत्रज्ञान देण्यासाठी पत्र दिले आहे. शिवाय विसर्जन केलेल्या मूर्तींवर पुनर्प्रक्रिया करण्यासाठी समितीही गठीत करण्यात येणार आहे. आता पालिकेने विसर्जनानंतर सर्व मूर्ती परत मिळवण्यासाठी नियमावलीच जारी केली आहे.
मुंबईमधील हजारो सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडील मूर्ती आणि घरगुती मूर्ती विसर्जित करण्यासाठी पालिकेने 200 हून जास्त कृत्रिम तलाव तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये 6 फुटांपर्यंतच्या मूर्ती कृत्रिम तलावांमध्येच विसर्जन करणे बंधनकारक करण्यात आले आहे, तर मोठय़ा मूर्ती समुद्र आणि नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जित केल्या जाणार आहेत. या मूर्ती 24 तासांच्या आत जलस्रोतांमधून यंत्रे किंवा मनुष्यबळाचा वापर करून बाहेर काढल्या जाणार आहेत.
अशी आहे कार्यपद्धती
कृत्रिम तलाव, तात्पुरत्या टाकी आणि जलस्रोतांमध्ये विसर्जित झालेल्या मूर्ती 24 तासांत पुनर्प्राप्त करणे.
मोठय़ा मूर्ती पुनर्प्राप्त करता याव्यात यासाठी व्रेनसारख्या योग्य संयंत्रांचा उपयोग करावा.
पुनर्प्राप्त केलेल्या सर्व मूर्तींचा योग्यपणे दस्तावेज तयार करण्यात यावा, जेणेकरून त्याची पडताळणी करता येईल.
मूर्ती ठेवणे आणि उतरवणे ही कामे योग्य रीतीने व्हावीत यासाठी किमान तीन कामगार नेमणे.
मूर्तींची वाहतूक सुरक्षितपणे, स्वच्छता राखून ठरलेल्या ठिकाणी (डायघर, शिळफाटा) नेणे.