
सामना प्रतिनिधी । मुंबई
मुंबईत नुकत्याच साजऱया झालेल्या ईदच्या उत्सवात आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन झाल्याचे समोर आले आहे. आवाज फाऊंडेशनने केलेल्या आवाजाच्या चाचणीत यंदा माझगाव येथे ईद सणाच्या दिवशी 105.3 डेसिबल इतक्या तीव्रतेची नोंद झाली. विशेष म्हणजे, गेल्या वर्षीही डॉकयार्डमध्ये आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन झाले होते. गेल्या वर्षी या ठिकाणी 105.2 डेसिबल इतक्या आवाजाच्या तीव्रतेची नोंद झाली होती. तो रेकॉर्डही यंदाच्या ईदने मोडला आहे.
सायंकाळी 5 वाजून 5 मिनिटांपासून ते 5 वाजून 18 मिनिटांपर्यंत आवाज फाऊंडेशनने येथील आवाजाच्या तीव्रतेची मोजणी केली. माझगावपाठोपाठ जे. जे. रुग्णालयानजीक असलेल्या मोहम्मद अली रोड आणि क्रॉफर्ड मार्केट या ठिकाणी 99.4 डेसिबल इतक्या आवाजाच्या तीव्रतेची नोंद झाली.
आवाजाची मर्यादा किती असावी?
ध्वनिप्रदूषण नियम 2000 अन्वये निवासी आणि सायलेन्स झोन असलेल्या क्षेत्रात आवाजाची मर्यादा 50 ते 55 डेसिबल दिवसा, तर रात्री ही मर्यादा 40 ते 45 डेसिबल इतकी असावी अशी तरतूद आहे.
अहवाल पोलीस आयुक्त, मुख्यमंत्र्यांना पाठवला
ईदच्या दिवशी कुठल्या ठिकाणी किती आवाजाच्या तीव्रतेची नोंद झाली याबाबतचा अहवाल पोलीस आयुक्त सुबोध जायसवाल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवल्याची माहिती आवाज फाऊंडेशनच्या अध्यक्षा सुमेरा अब्दुलाई यांनी दिली आहे.























































