निवडणूक आयोगाच्या माध्यमातून भाजपकडून मतांची चोरी – सपकाळ

काँग्रेसमुक्त भारत करण्याची घोषणा करणारा भारतीय जनता पक्ष काँग्रेसयुक्त झाला आहे. काँग्रेसचे नेते पक्षात घेतल्याशिवाय त्यांना एकही निवडणूक लढवता येत नाही. निवडणूक आयोगाच्या माध्यमातून भाजप मतांवर डल्ला मारत आहे. विधानसभा निवडणुकीत मतांची अशी चोरी करूनच ते सत्तेवर आले आहेत, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केल.

खडकवासला येथे काँग्रेस पक्षाने आयोजित केलेल्या दोनदिवसीय पदाधिकारी कार्यशाळेच्या उद्घाटनाआधी पत्रकारांशी बोलताना सपकाळ म्हणाले, काँग्रेसला गळती लागली, हा विरोधकांचा कांगावा आहे. काँग्रेस पक्ष हा विचारधारा असलेला पक्ष आहे. या विचारधारेला धुडकावून लावणारे नेते पक्षाला नकोच आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थोडे मागे वळून पाहिले तर अर्ध्याहून अधिक मंत्री काँग्रेस पक्षातून घेतलेलेच आहेत, हे त्यांच्या लक्षात येईल. ही भाजपची शोकांतिका आहे. भाजप आपल्याकडे १ कोटी कार्यकर्ते असल्याचे सांगत आहे. तर मग नेते कशासाठी आयात करता? असा प्रश्न सपकाळ यांनी भाजपला केला.

आमदार सतेज पाटील म्हणाले, राज्य सरकार शेतकरीविरोधी धोरणे राबवत आहे. ट्रॅक्टरला ब्लॅ क बॉक्स जोडण्याबाबतच्या सरकारच्या निर्णयाचा भार शेतकऱ्यांवरच पडणार आहे. माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या सरकारमध्ये सत्तेचा हावरटपणा सुरू असल्याची टीका केली. मतांसाठी कबुतरखाने तज्ज्ञ काय म्हणतात त्याकडे दुर्लक्ष करून सरकार कबुतरखाने मतांसाठी म्हणून वाचवत आहे, अशी टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. नागरिकांना कबुतरांमुळे होत असलेल्या जीवघेण्या आजारांचा सरकारने विचार करायला हवा, असेही ते म्हणाले.