
जम्मू-कश्मीरमधील चार आणि पंजाब राज्यातील एका राज्यसभेच्या जागेसाठी निवडणूक आयोगाने बुधवारी घोषणा केली. या दोन राज्यांतील एकूण पाच जागांसाठी हे मतदान पुढील महिन्यात 24 ऑक्टोबरला होणार आहे. निवडणुकीची अधिसूचना 6 ऑक्टोबरला जारी केली जाईल, असे निवडणूक आयोगाने म्हटलेय.
6 ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होईल. 13 ऑक्टोबरपर्यंत उमेदवार अर्ज दाखल करू शकतील. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची शेवटची तारीख 16 ऑक्टोबर आहे. 24 ऑक्टोबरला सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडेल. मतमोजणी त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजेपासून सुरू होईल. मतमोजणीनंतर निकाल जाहीर केला जाईल, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.