सांगली महापालिका पोटनिवडणुकीसाठी आज मतदान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सांगली महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ‘16 अ’च्या पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी मतदान होणार आहे. यासाठी काँग्रेस, भाजप, शिवसेनेसह सहा उमेदवार रिंगणात आहे. या प्रभागातील 24 हजार 390 मतदार 34 मतदान केंद्रांवर मतदानाचा हक्क बजाविणार आहेत. निवडणुकीसाठी 207 कर्मचारी प्रत्यक्ष नियुक्त असून, 30 कर्मचारी राखीव आहेत. मतदानासाठी मतदान अधिकारी आणि कर्मचारी सोमवारी मतदान केंद्राकडे रवाना झाले.

हारुण शिकलगार यांच्या निधनाने रिक्त झालेल्या प्रभाग क्रमांक ‘16 अ’च्या प्रचाराची सांगता रविवारी झाली, तर सोमवारी उमेदवारांनी छुप्या पद्धतीने प्रचार केला. पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदान होणार आहे, तर बुधवारी 19 रोजी मतमोजणी होणार आहे. मुख्य निवडणूक अधिकारी तथा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक यंत्रणेचे नियोजन केले आहे. स्टेशन चौकातील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाच्या आवारातून अधिकारी आणि कर्मचारी साहित्यासह मतदान केंद्रांवर रवाना झाले.

या प्रभागात शिवसेनेकडून महेंद्र चंडाळे, काँग्रेसकडून तौफिक शिकलगार, भाजपकडून अमोल गवळी, बहुजन वंचित आघाडीकडून उमरफारुक ककमरी, तर अपक्ष म्हणून सुरेश सावंत व समीर सय्यद निवडणूक रिंगणात आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर एक केंद्राध्यक्ष, 3 मतदान अधिकारी, एक शिपाई आणि एक पोलीस कर्मचारी अशा सहाजणांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर पाच टीम राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

बुधवारी मतमोजणी; स्टेशन रोड बंद राहणार
प्रभाग क्रमांक ‘16 अ’च्या पोटनिवडणुकीची मतमोजणी बुधवारी स्टेशन चौकातील महापालिकेचे जुने घरपट्टी कार्यालय येथे होणार आहे. मतमोजणी शांततेत होण्यासाठी राजवाडा चौक ते एस. एफ. सी. मेगा मॉलपर्यंतचा रस्ता वाहतुकीस बंद करण्यात येणार आहे, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

कर्जत, पारनेर व अकोल्यात उद्या राजकीय धमाका
नगरः सुमारे महिनाभराच्या ब्रेकनंतर जिह्यातील कर्जत, पारनेर व अकोले तालुक्यांतील राजकीय धमाक्याची वेळ एका दिवसावर येऊन ठेपली आहे. या तिन्ही तालुक्यांतील नगर पंचायतींच्या पहिल्या टप्प्यातील प्रत्येकी 13 जागांसाठी मागील 21 डिसेंबरला मतदान झाले आहे व राहिलेल्या प्रत्येकी 4 जागांसाठी मंगळवारी मतदान होणार आहे. त्यानंतर बुधवारी सर्व प्रत्येकी 17 जागांची मतमोजणी होणार असून, त्यावेळी या तिन्ही तालुक्यांवर राजकीय वर्चस्व आजी आमदारांचे की माजी आमदारांचे, हे स्पष्ट होणार आहे.