रत्नागिरी नगराध्यक्षपद पोटनिवडणूकीतत 47 टक्के मतदान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रत्नागिरी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणूकीसाठी रविवारी सकाळी 7.30 वाजल्यापासून 49 मतदान केंद्रांवर मतदानाला सुरुवात झाली. संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत रत्नागिरी शहरात 47.38 टक्के मतदान झाले. सोमवारी मतमोजणी होणार आहे. मतदानाचा टक्का घसरला असून चारही उमेदवारांचे भवितव्य मतदानयंत्रात बंद झाले आहे.

रत्नागिरीत 58,770 मतदार असून त्यामध्ये 28,746 पुरुष आणि 30,023 स्त्री मतदारांचा समावेश आहे. आज सकाळी 9 वाजेपर्यंत पहिल्या टप्प्यात 7.11 टक्के मतदान झाले होते. दुपारी 11 वाजेपर्यंत मतदानाची आकडेवारी 16 टक्क्यांपर्यंत वाढली. 3 वाजेपर्यंत 35 टक्के मतदान झाले. संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत 47.38 टक्के मतदान झाले. त्यामध्ये 14 हजार 400 पुरुष आणि 13 हजार 444 महिला अशा एकूण 27 हजार 444 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. रत्नागिरी शहरातील बूथवर शिवसेना उपनेते आमदार उदय सामंत आणि उमेदवार प्रदीप साळवी यांनी भेटी दिल्या. सकाळपासूनच मतदान संथगतीने सुरु होते. अपेक्षेपेक्षा मतदान कमी झाले असून कमी मतदानाचा फायदा कुणाला ? याची चर्चा शहरात रंगली आहे. संध्याकाळी उशीरापर्यंत मतदान यंत्रे नगरपरिषदेत जमा करण्यात येत होती. सोमवारी सकाळी 8 वाजल्यापासून नगरपरिषदेतील संत गाडगेबाबा सभागृहात मतमोजणी होणार आहे. नगराध्यक्षपदासाठी चार उमेदवार रिंगणात असून शिवसेनेचे प्रदीप उर्फ बंड्या साळवी,भाजपचे ॲड.दीपक पटवर्धन,राष्ट्रवादी काँग्रेसचे मिलिंद कीर,मनसेचे रूपेश सावंत निवडणूक लढवत आहेत.