
जगप्रसिद्ध लोणार पशुपक्षी अभयारण्य हे आपल्या अद्वितीय भौगोलिक रचनेसाठी आणि खाऱ्या पाण्याच्या सरोवरासाठी ओळखले जाते. आता या नैसर्गिक खजिन्यात आणखी एक अभिमानाची भर पडली आहे. आफ्रिकेत आढळणारा दुर्मिळ “Wahlberg’s Eagle” (वाह्लबर्गचा गरुड) हा पक्षी पहिल्यांदाच हिंदुस्थानात आणि तोही लोणार सरोवरात दिसून आला आहे.
या दुर्मिळ गरुडाचे लोणार अभयारण्यात दर्शन झाल्याने पक्षी अभ्यासक आणि निसर्गप्रेमींमध्ये मोठा आनंद आणि आश्चर्य व्यक्त केला जात आहे. माहितीप्रमाणे, हा गरुड सरोवर परिसरात शिकार करताना आणि खाताना दिसून आला. सचिन कापुरे या निसर्गप्रेमी व पक्षी निरीक्षकाने याचे फोटो टिपले असून त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, “हा गरुड आकाराने मध्यम असून, तीक्ष्ण दृष्टी आणि भव्य पंख फडकावत तो आकाशात झेप घेताना अत्यंत देखणा दिसत होता. आफ्रिकेतील सवाना प्रदेशात आढळणारा हा पक्षी लोणारमध्ये आढळणे ही विलक्षण घटना आहे.” असे त्यांनी सांगितले.
तज्ज्ञांच्या मते, Wahlberg’s Eagle हा गरुड प्रामुख्याने दक्षिण आणि पूर्व आफ्रिकेत आढळतो. तो लहान सस्तन प्राणी, पक्षी आणि सरीसृपांचा शिकार करतो. त्याचे लोणारमध्ये आगमन हवामानातील बदल, स्थलांतरित पक्ष्यांच्या मार्गातील विविध घटकांशी संबंधित असू शकते. या घटनेमुळे लोणार सरोवर केवळ भौगोलिकदृष्ट्या नव्हे तर जैवविविधतेच्या दृष्टीनेही एक अद्वितीय संशोधन केंद्र म्हणून उदयास येत आहे.
वाह्लबर्ग गरुडची मुख्य वैशिष्ट्ये :
- Wahlberg’s Eagle आफ्रिकन खंडातील दुर्मिळ शिकारी पक्षी
- हिंदुस्थानात प्रथमच लोणार अभयारण्यात दर्शन
- पर्यावरण व पक्षीप्रेमींत आनंदाचा आणि अभिमानाचा माहोल





























































