संरक्षण भिंत कोसळून चार दुचाकीचे नुकसान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । हिंगोली

हिंगोली शहरातील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या परिसरात पंचायत समिती कार्यालयाला लागून असलेली संरक्षण भिंत कोसळून चार दुचाकी वाहनांचे नुकसान झाल्याची घटना मंगळवारी घडली. सोमवारी रात्री झालेला संततधार पाऊस व मागील काही दिवसांत झालेल्या पावसामुळे तसेच निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे या संरक्षण भिंतीला तडे जाऊन त्याची परिमिती आज भिंत कोसळण्यात झाली.

हिंगोली येथे जिल्हा व सत्र न्यायालय तसेच अन्य न्यायालयीन इमारती आणि पंचायत समितीचे कार्यालय आजुबाजुला आहे. न्यायालय इमारत व पंचायत समितीच्या कार्यालयादरम्यान संरक्षण भिंत बांधण्यात आली होती. आज मंगळवारी दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास संरक्षण भिंतीचा मोठा भाग कोसळला. न्यायालयीन कामकाजासाठी आलेले पक्षकार व नागरिक यांची दुचाकी वाहने या संरक्षण भिंतीलगत उभी करत असतात. ही भिंत कोसळल्याने चार दुचाकी वाहनांचे नुकसान झाले. काही न्यायाधीश व न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी कोसळलेली भिंत पाहिली. दरम्यान, पावसामुळे भिंतीला गेलेले तडे व बांधकाम विभागाने केलेले निकृष्ट काम यामुळे ही भिंत कोसळल्याची चर्चा नागरिकांमधुन होत होती. भिंतीलगत नेहमी नागरिकही उभे असतात. मात्र, सुदैवाने कुठलीही जीवीत हानी झाली नाही.