
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या वाल्मिक कराड याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने हा जामीन अर्ज फेटाळला. गेल्या दोन दिवसांपासून यावर सुनावणी सुरू होती.
बीड जिह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडप्रकरणी वाल्मीक कराडविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून जामिनासाठी त्याने हायकोर्टात अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी वाल्मीकच्या वतीने युक्तिवाद करताना वकिलांनी सांगितले की, मोक्का कायदा चुकीच्या पद्धतीने लावला गेला आहे आणि देशमुख हत्याकांडात कराडचा संबंध नसून तो घटनेच्या दिवशी शेकडो किलोमीटर दूर होता. त्याला प्रकरणात गोवण्यात आले आहे. त्यावर सरकारी वकील ऍड. अमरजितसिंह गिरासे यांनी घटनाक्रम तपशीलवार सांगतानाच या घटनेतील साक्षीदार, मोबाईल फोन संवादाच्या तपशिलाचा (सीडीआर) अहवाल, सीसीटीव्ही फुटेज, ध्वनिफीत मुद्रण, न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला.


























































