युद्धामुळे प्लॅस्टिक उद्योगाचे कंबरडे मोडले! 20 हजार कारखाने बंद, तीन लाख लोक बेरोजगार होण्याच्या मार्गावर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा भडका चांगलाच उडाला आहे. याचे चटके थेट हिंदुस्थानातील प्लॅस्टिक उद्योगांना बसल्याने कंबरडे मोडले आहे. गुजरात, उत्तर प्रदेशातील अनेक छोटे कारखाने ठप्प झाले आहेत. गॅस तुटवड्यामुळे केवळ 30 ते 40 टक्के कारखाने सुरू आहेत. देशातील 20 हजार कारखाने बंद झाले असून जर हे युद्ध लांबले तर प्लॅस्टिक उद्योगातील जवळपास दोन ते तीन लाख लोक बेरोजगार होतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

इराण-इस्रायल युद्ध सुरू होण्यापूर्वी 80 ते 85 रुपये प्रति किलो विकला जाणाऱ्या एक ग्रेडच्या प्लॅस्टिकच्या दाण्याची किंमत आता 170 वर पोहोचली आहे. युद्धाआधी जीएसटीसह 112 रुपये प्रति किलो मिळणारा प्लास्टिकची दाणा आता 188 रुपये किलो मिळत आहे. भांडे धुण्यासाठी वापरल्या जाणाऱया प्लॅस्टिकच्या कपाची किंमत 5.50 रुपये होती. ती आता 9 रुपयांपर्यंत वाढली आहे. कारखान्यात उत्पादन होत नसल्यामुळे कर्ज घेऊन कारखाने उभारणाऱया उद्योगपतींची चिंता वाढली आहे. कारखान्यातील उत्पादन ठप्प झाले आहे; परंतु विजेच्या बिलात आणि ईएमआयमध्ये कोणतीही कपात झाली नाही, असे कारखानदारांचे म्हणणे आहे. एक लिटरची बाटली 5.5 रुपयांत तयार होत होती. ती आता 7 रुपयांपर्यंत पोहोचली आहे.

युद्धामुळे मागील 30 दिवसांत कच्च्या मालाच्या किंमती 50 ते 70 टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत. इतर पॉलिमर आणि कच्च्या मालाच्या किमतीतही प्रति टन 30 हजार ते 70 हजार रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. जर हे युद्ध असेच सुरू राहिले तर एप्रिलमध्ये प्लॅस्टिकच्या किंमती 50 ते 60 टक्क्यांपर्यंत वाढू शकतात. प्लॅस्टिकच्या टाक्या आणि कंटेनरच्या किंमतीत 30 ते 40 टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. परिस्थिती सामान्य होईपर्यंत प्लॅस्टिक उत्पादनांवरील 18 टक्के जीएसटी कमी करून 5 टक्क्यांपर्यंत करावा, अशी मागणी ऑल इंडिया प्लॅस्टिक मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनने केली आहे.
गुजरातच्या राजकोटमध्ये 40 हून अधिक प्लांट बंद झाले आहेत. मध्य प्रदेश, रायपूर आणि हैदराबादमध्येही अनेक प्लांट बंद आहेत. व्यावसायिक एलपीजीच्या कमतरतेमुळे बहुतांश युनिट्सना उत्पादन बंद करावे लागले आहे. जवळपास 20 हजार कारखाने बंद झाल्याचा अंदाज आहे. एलपीजी संकटामुळे लघु उद्योगांना टाळे लावण्याची वेळ आल्याने अनेक जण हवालदिल झाले आहेत.