
जम्मू–कश्मीरातील 370 कलम हटविल्यापासून बिथरलेल्या पाकडय़ांना युद्धाची खुमखुमी आली आहे. पाकिस्तानी सैन्याने प्रत्यक्ष नियंत्रणरेषेजवळ आणखी 2000 सैनिक तैनात केले आहेत. दरम्यान, सीमेवर युद्धाचे ढग जमू लागले असून पाकिस्तानी सैन्याच्या हालचालींना मूँहतोड जबाब देण्यासाठी हिंदुस्थानी लष्करही ऍलर्ट आहे.
पाकव्याप्त कश्मीरमधील बाघ आणि कोटली सेक्टरमधील नियंत्रणरेषेवर (एलओसी) हे सैनिक तैनात केले आहेत. हिंदुस्थानच्या सीमेपासून हे ठिकाण 30 कि.मी.वर आहे. एक ब्रिगेड म्हणजे सुमारे 2000 सैनिक आहेत. हे सैनिक आणखी पुढे सरकले नाहीत. मात्र हिंदुस्थानी लष्कराचे बारीक लक्ष आहे अशी माहिती सूत्रांनी दिली.
अफगाणी आणि स्थानिक तरुणांची मोठय़ा प्रमाणावर तोयबा, जैशमध्ये भरती
सीमेवर सैनिकांचे बळ वाढवतानाच पाकिस्तानकडून दहशतवादी कारवायाही मोठय़ा प्रमाणावर सुरू आहेत. लष्कर–ए–तोयबा आणि जैश–ए–मोहम्मद या दहशतवादी संघटनांमध्ये स्थानिक तरुण आणि अफगाणींची भरती केली जात आहे. दहशतवादी ट्रेनिंगही सुरू आहे.
दहशतवाद्यांच्या घुसखोरीसाठी 100 एसएसजी कमांडो
जम्मू–कश्मीरात दहशतवाद्यांची घुसखोरी करून रक्तपात घडविण्याचा पाकिस्तानचा कट आहे. त्यासाठी सीमेवर 100 एसएसजी कमांडो तैनात केले आहेत. कमांडोंच्या मदतीने दहशतवाद्यांची घुसखोरी करण्याचा प्रयत्न आहे, मात्र गेल्या महिन्यात हिंदुस्थानी जवानांनी घुसखोरीचा हा डाव उधळून लावताना पाकच्या 10 कमांडोजचा खात्मा केला होता. दरम्यान, गुजरातच्या सीमेजवळ सर क्रीक येथेही पाकने सैनिकांच्या खास तुकडय़ा तैनात केल्या आहेत.
सीमेवर तणाव निर्माण करून 370 कलमप्रकरणी आंतरराष्ट्रीय समुदायांचे लक्ष वेधण्याचा, हस्तक्षेप करायला लावण्याचा पाकिस्तानचा कट आहे.



























































