आरोग्य योजनांच्या एकत्रीकरणासाठी ‘वॉर रूम’

राज्यातील विविध आरोग्य योजनांचा समन्वय साधण्यासाठी, दुहेरी लाभ टाळण्यासाठी आणि सर्व आरोग्यविषयक योजनांची अंमलबजावणी एकाच छताखाली प्रभावीपणे करण्यासाठी ‘वॉर रूम’ स्थापन करण्यात येत आहे. ही ‘वॉर रूम’ मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या देखरेखीखाली कार्य करणार असून, महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्रा) चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली हा कक्ष स्थापन केला जाणार आहे.

या उपक्रमाचा उद्देश राज्यातील विविध आरोग्य योजनांचे सुसूत्रीकरण, पारदर्शकता आणि तातडीने मदत उपलब्ध करून देणे हा आहे. नागरिकांना राज्य व केंद्र शासनाच्या सर्व आरोग्य योजनांविषयी माहिती, मार्गदर्शन आणि मदत मिळावी यासाठी एकच सामान्य टोल-फ्री क्रमांक – 1800 123 2211 उपलब्ध करून देण्यात आला आहे. या क्रमांकावरून नागरिकांना तत्काळ माहिती, मार्गदर्शन आणि आवश्यक मदत मिळणार आहे.