एक जरी गोळी सुटली तर अमेरिकेची राखरांगोळी  होईल, इराणची धमकी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । तेहरान/वॉशिंग्टन

इराणने अमेरिकेचे अत्याधुनिक ड्रोन पाडल्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव कमालीचा वाढला आहे. त्यातच आज इराणने धमकी देताना एक जरी गोळी आमच्या देशावर झाडली तर अमेरिकेला जाळून बेचिराख करू, राखरांगोळी करू असा इशाराच दिला आहे. या घडामोडी पाहता आखातावर युद्धाचे ढग जमू लागले आहेत. दरम्यान, हिंदुस्थानी विमानांनी इराणच्या हवाईहद्दीचा वापर न करता मार्ग बदलला आहे.

तीन दिवसांपूर्वी अमेरिकेचे अत्यंत शक्तिशाली ड्रोन मानवरहित विमान इराणच्या लष्कराने मिसाईल डागून पाडले. इराणच्या हवाईहद्दीपासून 21 कि.मी. दूर ओमानच्या हद्दीत ड्रोन होते असा अमेरिकेचा दावा आहे. मात्र, अमेरिकेचे ड्रोन आमच्या हद्दीत घुसखोरी करीत होते असे इराणचे म्हणणे आहे.  

अमेरिका तीन ठिकाणी हल्ले करणार होती

ड्रोन पाडल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर मिसाईल हल्ले करण्याचे आदेश लष्कराला दिले होते. अमेरिकन लष्कराची लढाऊ विमाने हल्ले करण्यास सज्जही झाली. इराणमधील तीन ठिकाणांवर मिसाईल डागण्याची तयारी केली गेली. मात्र, हल्ल्यापूर्वी 10 मिनिटे आधी ट्रम्प यांनी गुरुवारी मध्यरात्री निर्णय मागे घेतला. 150 निष्पाप लोकांचा मृत्यू झाला असता म्हणून मिसाईल डागले नाहीत असे ट्रम्प यांनी सांगितले. शुक्रवारी व्हाईट हाऊस येथे बोलताना ट्रम्प यांनी पुन्हा इराणला इशारा दिला आहे. अमेरिकेला युद्ध नको पण इराण जर कुरापत करीतच राहिला तर शांत बसणार नाही. इराणचा नामोनिशाण मिटवून टाकू. आजवर कोणी पहिला नाही असा धडा शिकवू असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे.  

इराणचे प्रत्युत्तर

अमेरिकेच्या इशार्‍याला इराणने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. अमेरिकेने आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांनी एक जरी गोळी इराणवर झाडली तर मोठी किंमत त्यांना चुकवावी लागेल. याचे गंभीर परिणाम अमेरिकेला भोगावे लागतील. अमेरिकेला आम्ही जाळून टाकू. अमेरिकेची राखरांगोळी करू अशी धमकीच इराण लष्कराचे प्रवक्ते ब्रिगेडियर अबोलफजल शेकारची यांनी दिली आहे.

अमेरिका काय करू शकते?

आगामी काळात अमेरिकेकडून इराणवर आंतरराष्ट्रीय दबाव मोठय़ा प्रमाणावर वाढविला जाईल. इराणच्या अण्वस्त्र्ा कार्यक्रमावर अमेरिका नजर ठेवेल. तसेच आणखी आर्थिक निर्बंध लादून कोंडी केली जाईल. इराणवर दबाव कायम ठेवण्यासाठी आखातामध्ये अमेरिकन लष्कर आणि मित्रराष्ट्रांच्या फौजा तैनात केल्या जाऊ शकतात. त्यामुळे आखातात युद्धाची शक्यता नाकारता येत नाही, असे संरक्षण तज्ञांचे मत आहे.

आखातातील तणावाच्या पार्श्वभूमीवर हिंदुस्थानी विमानांचा मार्ग बदलला आहे. इराण, ओमान या देशांच्या हवाई हद्दीतून हिंदुस्थानचे आंतरराष्ट्रीय फ्लाइट्स जाणार नाहीत. दुसर्‍या मार्गांचा अवलंब करतील, असे डिरेकटोरेट जनरल ऑफ सिव्हिल एविएशनने (डीजीसीए) म्हटले आहे. एअर इंडियासह इतर खासगी कंपन्यांची विमाने नवीन मार्गाने जाणार आहेत. हिंदुस्थानी हवाई दलाने बालाकोट येथे हल्ला केल्यानंतर 26 फेब्रुवारीपासून पाकिस्तानची हवाई हद्द हिंदुस्थानी विमानांसाठी बंद आहे. आता इराणची हवाई हद्द बंद केली आहे. यामुळे अमेरिका, युरोपियन देश, दुबई येथे जाणार्‍या हिंदुस्थानी विमानांच्या वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.