अनैतिक संबंधातून नऊ जणांची हत्या, वारंगल हत्याकांडात खळबळजनक खुलासा

13451

तेलंगणातील वारंगल येथील 9 प्रवाशांच्या हत्येचा उलगडा झाला असून त्याचं कारण अनैतिक संबंध असल्याचं वृत्त आहे. गुरुवारी वारंगल येथील एका विहिरीत नऊ जणांचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली होती. त्या हत्यांचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आलं आहे.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, गुरुवारी वारंगल इथल्या एका विहिरीत नऊ मृतदेह सापडले होते. मोहम्मद मकसूद असं यातील हत्या झालेल्या एकाचं नाव होतं. सापडलेल्या मृतदेहांमध्ये मकसून यांची पत्नी, मुलगी, मुलगे, नातू यांचेही मृतदेह होते. ही हत्या असावी की आत्महत्या याचा तपास पोलीस करत होते. शवविच्छेदन अहवालात त्यांना विष पाजून त्यांची हत्या झाल्याचा उलगडा झाला. मूळचं बंगालचं असलेलं हे कुटुंब कामासाठी तेलंगणा येथे आलं होतं. त्यामुळे इतकं भयंकर हत्याकांड करण्यामागे कुणाचा हात असावा, हा प्रश्न पोलिसांना सतावत होता. त्यासाठी मृतांच्या मोबाईलचे डिटेल्स मागवण्यात आले होते. या तपासात मकसूद यांना ओळखणाऱ्या कुणाचा तरी हात असावा, असा संशय पोलिसांना होता. त्यानुसार त्यानी मकसूद यांच्यासह सर्वांच्या मोबाईलचे तपशील तपासायला सुरुवात केली.

तपासाअंती त्यांचा संशय संजय कुमार झा याच्यावर येऊन थांबला. त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने या हत्यांची कबुली दिली. मकसूद यांची मुलगी बुशरा हिच्याशी संजय याचे अनैतिक संबंध होते. बुशरा घटस्फोटिता होती आणि तिला एक लहान मूलही होतं. पण, काही दिवसांपासून बुशराचं वागणं बदललं होतं. ती गेल्या काही दिवसांपासून श्रीराम कुमार आणि श्याम कुमार या दोन बिहारी तरुणांशी जवळीक साधत असल्याचं संजयच्या लक्षात आलं होतं. या प्रकरणामुळे संतापलेल्या संजयने तिच्यासह तिच्या कुटुंबाचा काटा काढायचा निर्णय घेतला.

या कामात त्याला याकूब, मोहन आणि मनकोस अशा तीन अन्य आरोपींनी मदत केली. गेल्या आठवड्यात बुधवारी रात्री या कुटुंबाला वाढदिवसाच्या पार्टीचं निमंत्रण देण्यात आलं. तिथे पार्टीत सगळ्यांना शीतपेयांतून विष पाजण्यात आलं. आणि नंतर या नऊ जणांचे मृतदेह विहिरीत फेकून देण्यात आले, अशी कबुली संजय याने दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या