श्री विठ्ठलाचा तुळशीहार अन् वारकरी संप्रदायाची पवित्र वीणा भोंदू बाबाच्या गळ्यात, दीपक साळुंखे यांच्या कृतीने वारकऱ्यांत संताप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भोंदू बाबा अशोक खरात आणि त्यांच्या पत्नीचा तुळशीहार व वीणा देऊन सन्मान केल्याने सांगोल्याचे माजी आमदार दीपक साळुंखे यांच्याविषयी वारकरी संप्रदायात संतापाची लाट उसळली आहे. स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी साळुंखे यांनी प्रति विठ्ठल रखुमाई म्हणून भोंदू बाबाला दिलेले देवतांचे स्थान हे वारकऱ्यांच्या श्रद्धेला ठेच पोहचविणारे आहे. या कृतीबद्दल माजी आमदार साळुंखे यांनी तमाम वारकरी संप्रदायाची जाहीर माफी मागावी, अशी मागणी विश्व वारकरी सेनेचे अध्यक्ष ह.भ.प. अरुण महाराज बुरघाटे यांनी केली आहे.

दीपक साळुंखे हे अंधश्रद्धाळू असल्याने त्यांची उठबस नेहमीच भविष्य आणि भोंदू बाबा यांच्यात असल्याचे यापूर्वी दिसून आले आहे. हा त्यांचा वैयक्तिक विषय असल्याने, त्यावर कोणी आक्षेप घेण्याचे कारण नाही. पण महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्री विठ्ठल रखुमाईप्रमाणे दुष्ट कृत्य करणाऱ्याचा सत्कार आणि सन्मान करणे हा त्या देवतांचा आणि वारकरी संप्रदायाचा अपमान आहे. या कृतीबद्दल साळुंखे यांनी संप्रदायाची जाहीर माफी मागावी अशी मागणी ह.भ.प. बुरघाटे यांनी केली आहे.

सार्वजनिक जीवनात वावरताना अनेक कार्यक्रमात कोणाच्या तरी भेटी होत असतात. त्याच पद्धतीने त्यांची माझी भेट झाली आहे. कुणीतरी त्यांना वीणा भेट दिली होती. त्याला मी फक्त हात लावला आहे. मी हे नाकारणार नाही. जाणीवपूर्वक काही वैफल्यग्रस्त लोकांनी त्या भगिनीला माझ्याविषयी चुकीची माहिती दिली आहे. परंतु सध्या टीव्हीवर जे काय येत आहे त्याच्याशी माझा कसलाही संबंध नाही, अशी प्रतिक्रिया माजी आमदार दीपक साळुंखे यांनी दिली.

सांगोल्याचे माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांचे खरात सोबत आर्थिक व्यवहार झाले आहेत. ते हळूहळू पुढे येत आहे. खरात यांच्या मुलीला 32 ते 34 लाखाच्या आसपास किंमत असलेला फ्लॅट सांगोल्याच्या माजी आमदारांनी भेट दिला आहे. या सगळ्याचे धागेदोरे आपल्याला सांगोल्यात सापडतील. सांगोल्यामध्ये पूजेला खरात व इतर सगळी मंडळी गेली होती असा आरोप शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सांगोल्याचे माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांच्यावर केला आहे.