
आळंदी येथील जाहूरकर वारकरी शिक्षण संस्थेत बारावर्षीय मुलीचे शोषण झाल्याचा प्रकार समोर आला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी माधव खांडेकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने संस्थेची प्रत्यक्ष पाहणी केल्यावर त्रुटी आढळल्याने संस्थेवर कारवाई करून संस्था बंद करण्यात आली आहे. तसेच येथील ४३ मुले आणि ४ मुलींचे शासकीय बालगृहात पुनर्वसन करण्यात आले आहे.
आळंदी येथील जुन्या एसटी स्टॅण्डलगत जाहूरकर महाराज यांचे नावे वारकरी शिक्षण संस्था आहे. येथे शालेय मुलांचे शिक्षण, तसेच वारकरी सांप्रदायिक शिक्षण दिले जात होते. या संस्थेतील ४३ मुले व ४ मुलींना ज्ञानेश बालमंदिर, फुलगाव (मरकळ रोड), ज्ञानमंदिर बालगृह, (नारकरवाडी, ता. आंबेगाव, सह्याद्री बालगृह; पंकटिका, घोडेगाव रोड, मंचर) या तीन शासकीय मान्यता प्राप्त बालगृहांत पाठविले आहे. मुख्याधिकारी माधव खांडेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके, सीमा चारभे, प्रदीप आवारी, वैशाली पाटील, मिथिल पाटील, पूजा नाईक, श्वेता शेलकर, अर्जुन घोडे, शत्रुघ्न खोकले, मच्छिंद्र शेंडे यांनी ही कारवाई केली.





















































