अमेरिकेचे इराणवर सायबर हल्ले, ट्रम्प नवे प्रतिबंध लादणार

सामना ऑनालाईन। वॉशिंग्टन

इराण आणि अमेरिकेमधील तणाव वाढला आहे. महागडे ड्रोन पाडल्याचा बदला घेत अमेरिकेने इराणच्या मिसाईल कंट्रोल सिस्टम आणि गुप्तचर नेटवर्कवर सायबर हल्ला केला. एवढेच नव्हे तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सोमवारपासून इराणवर नवीन प्रतिबंध लादणार आहेत.

इराणने ड्रोन पाडून उचापत्या सुरू केल्यामुळे अमेरिकेच्या संतापाचा भडका उडाला आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी रविवारी इराणला परमाणू शस्त्र विकसित करू देणार नसल्याचा इशारा ट्विटरद्वारे दिला. इराणजवळ परमाणू शस्त्र असू शकत नाही. ओबामाच्या खतरनाक कारस्थानामुळे इराणने खूप कमी वर्षांत न्यूक्लिअरचा रस्ता धरला आहे. याच इराणला ताळ्यावर आणण्यासाठी आम्ही सोमवारपासून अनेक नवीन प्रतिबंध लादणार आहोत, असे ट्रम्प यांनी ट्विट केले.

सैन्य कारवाईचा विचार करतच राहणार
जोपर्यंत इराण सुधारत नाही, परमाणूसंबंधी समस्येवर आमचे समाधान होत नाही तोपर्यंत इराणविरोधात सैन्य कारवाईचा विचार करतच राहणार, अशा शब्दांत ट्रम्प यांनी इराणला ठणकावले. दरम्यान, इराणने आपल्याविरोधातील कोणताही हल्ला अमेरिकेला चांगलाच महागात पडेल, असा इशारा दिला आहे.

इराणने 2015 मध्ये केला होता परमाणू करार
2015 मध्ये इराणने अमेरिका, चीन, रशिया, जर्मनी, फ्रान्स आणि ब्रिटनसोबत एका करारावर स्वाक्षरी केली होती. त्या करारानुसार इराणने त्यांच्यावर लादलेले आर्थिक प्रतिबंध हटवण्याच्या बदल्यात आपल्या परमाणू मोहिमेला मर्यादित ठेवण्यास सहमती दर्शवली होती. ट्रम्प यांनी 2018 मध्ये परमाणू करारापासून अमेरिका वेगळी होत असल्याची घोषणा केली होती. तेव्हापासून दोन देशांमधील तणाव वाढला आहे.

नव्या निर्बंधांचा इराणला असा बसेल फटका
तेहरानमधील परिस्थिती न बदलल्यास आर्थिक दबाव आणला जाईल.
ऊर्जा, शिपिंग आणि आर्थिक क्षेत्रात निर्बंध लागू करण्याचा ट्रम्प यांचा विचार आहे. परिणामी, परदेशी गुंतवणूक कमी होईल तसेच तेल आयातीलाही फटका बसेल.
नव्या निर्बंधामुळे अमेरिकेबरोबरच इतर देशांतील कंपन्याही इराणशी व्यापार करू शकणार नाहीत. परिणामी, इराणमध्ये परदेशातून येणाऱया कच्च्या मालाची कमतरता जाणवेल.