
वाशिममध्ये भाजपच्या उमेदवाराकडून दादागिरीचा गंभीर प्रकार समोर आला असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाच्या उमेदवारावर चाकूहल्ल्याचा प्रयत्न आणि गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला असून, भाजप उमेदवाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एबीपी माझाने या बाबत वृत्त दिले आहे. वाशिम जिल्ह्यातील लाखाळा परिसरात रात्री सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार गुड्डू उर्फ प्रवीण डोळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार भाजपचे उमेदवार सतीश उर्फ गल्ला वानखेडे यांनी निवडणुकीच्या कारणावरून वाद घालून त्यांना गंभीर धमक्या दिल्या.
प्रवीण डोळे हे त्यांच्या मित्रांसोबत असताना सतीश वानखेडे तेथे आले. यावेळी निवडणूक आणि मतदानाच्या मुद्द्यावरून वाद झाला. वाद वाढल्यानंतर वानखेडे यांनी डोळे यांच्यावर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला तसेच गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिली. यावेळी डोळे यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांनाही मारहाण करण्यात आली.
या घटनेनंतर वाशिम शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवाराच्या तक्रारीवरून भाजप उमेदवार सतीश उर्फ गल्ला वानखेडे याच्याविरोधात मारहाण, धमकी आणि हल्ल्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर सतीश वानखेडे फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे वाशिम शहर आणि परिसरात राजकीय वातावरण तापले असून, निवडणूक काळात वाढलेल्या तणावाबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे.
याच पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडून मतदारांना आवाहन करण्यात आले आहे की, कोणत्याही आमिषांना, दबावाला किंवा धमक्यांना बळी न पडता निर्भयपणे मतदान करावे. निवडणूक प्रक्रियेत हिंसाचार आणि दहशतीला थारा देऊ नये, असेही आवाहन करण्यात आले आहे.






























































