
सामना ऑनलाईन, संभाजीनगर
मृत साठ्यापर्यंत पोहोचलेल्या जायकवाडी धरणात गोदावरी नदीच्या पाण्याची आवक सुरू झाली आहे. या धरणातील पाण्याने मृतसाठ्यातून जिवंत साठ्यात येण्यच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. हा प्रवास अत्यंत संथगतीने सुरू आहे. गेल्या 48 तासात धरणातील पाणीसाठ्यात एकूण 4 टक्क्यांची वाढ झाली आहे.
जायकवाडी धरणाच्या जलाशयात सध्या 21 हजार क्युसेक्स पाण्याची आवक चालू आहे. धरणात 454.600 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा असून या धरणातील पाणीसाठा ‘मृत साठ्यातून’ बाहेर यायला 125.466 दशलक्ष घनमीटर एवढ्या पाण्याची गरज आहे.
जायकवाडी धरणाची जलक्षमता ही 2 हजार 909 दशलक्ष घनमीटर आहे. या महाकाय प्रकल्पात नाशिकसह वरच्या भागात पाऊस पडत असल्याने गोदावरी नदीचे पाणी नाथसागरात येत आहे. गेल्या दोन दिवसांपासून जायकवाडी धरणाची पाणीपातळी संथगतीने वाढत आहे. ऊणे 9 टक्के असलेली पाणीपातळी आता ऊणे 5.78 टक्क्यांवर आली आहे अशी माहिती जलसंपदा विभागाच्या दगडी धरण ऊपविभागाचे स्थापत्य अभियंता आर.जे. गायकवाड यांनी दिली. सकाळी 9 वाजताच्या नोंदीनुसार धरणात प्रतिसेकंद 21 हजार 97 क्युसेक्स इतके पाणी धरणात पोहचत आहे. नांदूर मधमेश्वर प्रकल्पासह वरच्या भागातील धरणांची पाणीस्थिती सुधारत आहे. नाथसागरात पाण्याची आवक वाढल्यास दोनचार दिवसांत धरणाच्या पाणीपातळीत वाढ होऊन मृतसाठ्यातून बाहेर पडता येईल. अशी माहिती जलसंपदा सूत्रांनी दिली.


























































