
यंदा अल निनोचा प्रभाव असल्याने सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर मुळा धरणातून सोडण्यात आलेल्या आवर्तनातून सुमारे 3000 दशलक्ष घनफूट पाणी वाचविण्यात आले. गेल्या वर्षी 100 टक्के भरलेल्या मुळा धरणात सध्या 12 हजार 250 दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक आहे. त्यामुळे ऑगस्टपर्यंत पावसाने ओढ दिली तरी पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार नाही.
नगर जिह्याच्या समृद्धीत महत्त्वाचे मानले जाणाऱ्या मुळा धरणाची पाणी साठवण क्षमता 26 हजार (26 टीएमसी) दशलक्ष घनफूट आहे. यंदा अल निनोच्या प्रभावामुळे मान्सूनमध्ये कमी पर्जन्यमानाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मुळा पाटबंधारे विभागाने पाण्याचे नियोजन आखले आहे. सद्यस्थितीला मुळा धरणात एकूण 12250 दशलक्ष घनफूट जलसाठा शिल्लक आहे. त्यापैकी 7750 उपयुक्त साठा आहे. हा आकडा मागील पाच वर्षांतील 28 मे या दिवसाच्या तुलनेत सर्वाधिक आहे. यंदा पाऊस लांबणीवर गेला तरी पाण्याची टंचाई जाणवणार नाही. मुळा धरणात मुबलक पाणीसाठा असला, तरी काटकसरीने पाणी वापरण्याचे आवाहन पाटबंधारे विभागाने बिगर सिंचन वापर करणाऱ्या संस्थांना केले आहे.
1140 दलघफू पाण्याची वाफ
मुळा धरणातील एकूण 26000 दलघफू पाण्यापैकी 4500 दलघफू मृतसाठा असून, 21 हजार 500 दलघफू पाणी वापरायोग्य असते. वर्षभरात 1450 दलघफू पाण्याचे बाष्पीभवन होते. आतापर्यंत 1140 दलघफू पाण्याची वाफ झाल्याची माहिती उपअभियंता शरद कांबळे यांनी दिली.
ऑगस्टपर्यंत 2 टीएमसी पाणी शिल्लक
मागील दोन रोटेशनमध्ये धरणातील पाणी वाचविण्यात आले आहे. पाण्याचा अनधिकृत उपसा टाळण्यासाठी शटडाऊन घेतले जात आहे. बिगर सिंचन संस्थांनाही पाणी काटकसरीने वापरण्याबाबत सूचना दिल्या आहेत. पाण्याचा वापर काटकसरीने केला जात असून, ऑगस्टपर्यंत 2 टीएमसीपेक्षा पाणी शिल्लक राहील, असे कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी सांगितले.
सिंचनासाठी 11418 दलघफू पाणी
उजवा कालवा – रब्बी (9 जानेवारी ते 16 फेब्रुवारी) 3298 दलघफू, उन्हाळी एक (2 मार्च ते 9 एप्रिल) 4012 दलघफू, उन्हाळी दोन 7 मे पासून सुरू आतापर्यंत 2586 दलघफू पाणी सोडले. अजून दोन टीएमसी पाणी सोडले जाईल. डाव्या कालव्याद्वारे सोडलेल्या चार आवर्तनांद्वारे आतापर्यंत 1 हजार 522 दलघफू पाणी सोडले. 11418 दलघफू पाणी कालव्याद्वारे सोडले आहे.
काय फायदा होईल
मुळा धरणातील सध्याचा जलसाठा पाहाता ऑगस्टपर्यंत पाऊस झाला नाहीतरी 2 टीएमसी पाणी शिल्लक राहू शकते. बिगर सिंचन योजनांची पाणीकपात टळेल. पाऊस वेळेत आला, तर धरणात जुलैपासूनच नवीन पाण्याची आवक सुरू होऊन धरण लवकरच शंभर टक्के भरणार आहे. तसेच अतिरिक्त पाणी नदीपात्राद्वारे जायकवाडीला सोडले जाईल.




























































