
सामना ऑनलाईन, पनवेल
सत्ताधारी भाजपच्या ढिसाळ कारभारामुळे पनवेलकरांवर ओढवलेले पाणीटंचाईचे संकट टळणार आहे. शिवसेनेने याबाबत जोरदार पाठपुरावा केला असून एमआयडीसीने अडीच एमएलडी पाणी वाढवून देण्यास सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे नागरिकांना सुरळीत पाणी मिळणार आहे.
पनवेल शहराला दररोज 28 एमएलडीपैकी एमआयडीसीकडून प्रतिदिन साडेपाच एमएलडी पाणीपुरवठा होतो. मात्र टंचाईचे कारण देत आता दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे पालिकेने जाहीर केले आहे. याबाबत शिवसेनेचे माजी नगरसेवक व महानगर संघटक ऍड. प्रथमेश सोमण यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची तातडीने मंत्रालयात भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्याची दखल घेत देसाई यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. तसेच पाणी वाढवून देण्यासंदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल असेही सांगितले. याप्रसंगी शहरप्रमुख रूपेश ठोमरे, युवासेनेचे नरेश ढाळे यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
भाजपचे आमदार, महापौर गप्प का?
पनवेलकर पाणीटंचाईला सामोरे जात असताना भाजपचे स्थानिक आमदार प्रशांत ठाकूर व महापौर डॉ. कविता चौतमल गप्प का, असा सवाल नागरिक विचारत आहेत. पाणीपुरवठा मंत्री हे भाजपचे असतानाही पालिकेतील सत्ताधारी पाणीटंचाईच्या भीषण प्रश्नावर कोणताही मार्ग काढत नसल्याने संताप व्यक्त होत आहे.





























































