यंदा पावसाने मध्य रेल्वेला सतरा ठिकाणी खतरा, सर्व ठिकाणी उच्च क्षमतेचे पंप सज्ज

504

मुंबईकरांना येत्या पावसाळ्यात सुरळीतपणे सेवा देता यासाठी मध्य रेल्वेने आपल्या हद्दीतील नालेसफाईची हाती घेतलेली कामे झटपट पूर्ण करीत अंतिम टप्प्यात आणली असून पावसाळ्यात 17 धोकादायक स्पॉटवर उच्च क्षमतेचे पंप बसविण्यात येणार आहेत.

मध्य रेल्वेने लोकल ट्रेन चालविण्यापूर्वीची पूर्वतयारी जोमाने सुरू केली आहे. उपनगरी भागात 113 कि.मी. नाल्यांची साफसफाई केली आहे. मुख्य मार्गावरील 55 आणि हार्बर मार्गावरील 22 असे एकंदर 77 कल्वर्टसची साफसफाई  केली आहे. झाडांच्या फांद्या कमी करणे, दरडीचे (बोल्डर) स्कॅनिंग करणे, पावसात सिग्नल यंत्रणा सुरु रहावी म्हणून मल्टी-अ‍ॅस्केल डिजिटल काऊंटर बसविण्यात आले आहेत.

140 हून अधिक पंपांची व्यवस्था

मध्य रेल्वेने मुसळधार पावसात पाणी तुंबणारी 17 असुरक्षित ठिकाणे शोधून काढली आहेत आणि त्या ठिकाणी 140 हून अधिक पंपांची (रेल्वे व पालिकेद्वारे) बंदोबस्त केला आहे. मुख्य मार्गावर मस्जिद, माझगाव यार्ड, भायखळा, करी रोड, शीव, कुर्ला, विक्रोळी, घाटकोपर, नाणीपाडा, ठाणे, डोंबिवली व हार्बर मार्गावर शिवडी, वडाळा, चुनाभट्टी, कोपरखैरणे आणि मुख्य मार्गावरील दक्षिण- पूर्व घाटातील भुयारी मार्ग (सबवे) असे धोकादायक स्पॉट निवडले आहेत. मध्य रेल्वेने मुख्य मार्गावरील 55 आणि हार्बर मार्गावरील 22 असे एकंदर 77 कल्वर्टसची साफसफाई केली आहे.

मध्य रेल्वेने घाटकोपर-कांजूरमार्ग, घाटकोपर-विक्रोळी दरम्यानचे नाले आणि कुर्ला टर्मिनल नाला हे अतिशय महत्वाचे नाले साफ केले आहेत.

कर्जत ते लोणावळ्यात 52 बोगद्यांची तपासणी

मध्य रेल्वेने आपल्या मार्गावरील 52 बोगद्याजवळ आणि डोंगर कडयावरील बोल्डर स्कॅनिंग केले आहेत. तसेच वेगवेगळ्या 74 ठिकाणी पेट्रोलिंग करण्यासाठी पाहरेकरी तैनात केले आहेत. तसेच 24×7 सातत्याने पहारा ठेवण्यासाठी आणि वाहतुकीस कोणताही अडथळा येवू नये म्हणून 54 पेट्रोलमन तैनात केले जात आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या