मोहिनी एकादशीला दूषित पाण्यात वारकऱ्यांचे स्नान, ‘उजनी’तून पाणी सोडले; मात्र, बंधाऱ्यातून सोडण्याचे औदार्य नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> सुनील उंबरे

मोहिनी एकादशीच्या मुहूर्तावर चंद्रभागा नदीचे स्नान आणि श्री विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी लाखो वारकरी पंढरीत दाखल झाले आहेत. मात्र स्नानासाठी नदीवर गेलेल्या भाविकांची घोर निराशा झाली. चंद्रभागेच्या पात्रात पुरेसे पाणी नसल्याने, अस्वच्छ आणि दुर्गंधीयुक्त गुडघाभर पाण्यात वारकऱयांना स्नान उरकावे लागले. बहुतांश भाविकांनी स्नान न करता हातपाय धुऊन समाधान मानले.

उजनी धरणामधून 23 एप्रिलला भीमा नदीत पाणी सोडण्यात आले आहे. हे पाणी पंढरपूरकडे येत असून, पंढरपूरमधील गुरसाळे आणि जुना दगडी पूल बंधाऱयातून पाणी सोडून भाविकांच्या स्नानाची सोय करणे प्रशासनाला सहज शक्य होते. मात्र, प्रशासनात ताळमेळ नसल्याने भाविकांना गुडघाभर दुर्गंधीयुक्त पाण्यात स्नान उरकावे लागले.

उन्हाचा पारा चाळिशी पार गेला आहे. अशा कडक उन्हात एकादशीची वारी पोहोचती करण्यासाठी दोन लाखांहून अधिक वारकऱयांनी पंढरीत गर्दी केली आहे. वारीसाठी आलेला प्रत्येक वारकरी चंद्रभागेच्या स्नानासाठी आग्रही असतो. त्यामुळे पात्रातील पाण्याची परिस्थिती लक्षात घेऊन स्थानिक प्रशासनाने वेळीच नदीची स्वच्छता करून बंधाऱयातून पाणी सोडणे अपेक्षित होते. मात्र, त्यांच्यातच ताळमेळ नसल्याने हे औदार्य दाखविण्यात आले नाही. त्यामुळे पात्रात साठलेल्या गुडघाभर घाण पाण्यात भाविकांनी स्नान उरकले. काळेकुट्ट पाणी, फाटके कपडे, पूजेचे साहित्य, शेवाळ अन् दुर्गंधी पाहून अनेकांनी स्नान न करता दूरूनच चंद्रभागेचे दर्शन घेतले, तर काहींनी हातपाय धुण्यावर समाधान मानले.

उजनीचे पाणी आज पंढरीत पोहोचणार! 

उजनी धरणातून चार दिवसांपूर्वी भीमा नदीत पाणी सोडले आहे. हे पाणी उद्या (दि. 28) नाहीतर बुधवारी (दि. 29) पंढरपूरमध्ये पोहोचणे अपेक्षित आहे. पुढे हे पाणी सोलापूरकडे जाणार असल्याने महिनाभर हा पाण्याचा प्रवाह पंढरपूरमधून वाहत राहणार आहे. जुना पूल आणि गुरसाळे बंधारा हा पंढरपूर व सांगोला शहरांना पिण्याच्या पाण्यासाठी राखीव आहे. मात्र, दोन दिवसांत उजनीचे पाणी या बंधाऱयात येणार होते. त्यामुळे भाविकांची गैरसोय दूर करण्यासाठी या बंधाऱयातून काही पाणी चंद्रभागेत सोडणे गरजेचे होते. मात्र, प्रशासनात ताळमेळ नसल्याचा फटका भाविकांना बसला. याबाबत नगराध्यक्ष आणि आमदारांनी लक्ष देण्याची गरज पंढरपूरकर व्यक्त करत आहेत.