
पुढील पाच वर्षांत घनकचऱयाचे विलगीकरण, प्रक्रिया आणि सांडपाणी पुनर्वापर प्रकल्पांचे आराखडे केवळ कागदावर ठेवू नका तर हे प्रकल्प प्रत्यक्षात आणा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नगर विकास विभागाच्या अधिकाऱयांना दिले.
नगरविकास विभागाच्या बैठकीत आज घनकचरा आणि सांडपाणी पुनर्वापर प्रकल्पांविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आढावा घेण्यात आला. याविषयीची माहिती नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
लोकसहभागातून सांडपाणी व्यवस्थापन करा – आदित्य ठाकरे
घनकचरा आणि सांडपाण्याच्या व्यवस्थापनात जास्तीत जास्त लोकांचा सहभाग कसा घेता येईल हे पाहिले पाहिजे. पुढील काळात वैयक्तीक शौचालयांच्या निर्मितीवर विशेषत्वाने लक्ष देणे आवश्यक आहे. सांडपाण्याच्या पुनर्वापराबाबत प्रकल्प राबविल्यास त्याचा येणारा खर्च हा धरणे बांधण्यास येणाऱया खर्चापेक्षा कमी येतो. वाढत जाणाऱया पाण्याच्या मागणीची पूर्तता पुनर्वापर करूनच भागवावी लागते. त्याशिवाय उद्योग आणि छोटय़ा शहराशेजारी असलेल्या शेतीला त्यातून पाण्याची उपलब्धता होईल, अशी माहिती पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिली.

























































