जल अभियंत्यांकडून ‘बीपीटी’मध्ये कोट्यवधींचा पाणी घोटाळा, महापौरांकडून चौकशीचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
bmc

मुंबई पोर्ट ट्रस्टमधील काही वसाहतींना पालिकेच्या जल अभियंत्यांकडून गेल्या 17 वर्षांपासून प्रतिदिन 3 लाख 60 हजार लिटर पाणी बेकायदेशीरपणे दिले जात असल्याचा गंभीर आरोप स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी महासभेत केला. या कोट्यवधीच्या घोटाळ्याची चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केले. यावेळी सर्वपक्षीयांनी शिवसेनेच्या मागणीला पाठिंबा दिल्याने महापौर किशोरी पेडणेकर यांनी संबंधित प्रकरणाची एका महिन्यात चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश पालिका प्रशासनाला दिले.

‘बीपीटी’मधील अनेक वसाहतींना संबंधित प्रशासनाकडून पाणीपुरवठा केला जात नाही. त्यामुळे तत्कालीन नगरसेविका यामिनी जाधव, नाईक यांनी पाठपुरावा केल्यानंतर निम्म्या रहिवाशांना पालिकेकडून पाणीपुरवठा करण्यास सुरुवात झाली. मात्र ज्या रहिवाशांना पाणी मिळत नव्हते त्यांना पालिकेच्या दोन जल अभियंत्यांनी बेकायदेशीरपणे कनेक्शन देऊन पालिकेकडून 40 रुपये एक हजार लिटर मिळणारे पाणी तब्बल 450 रुपये प्रति एक हजार लिटर इतक्या दराने गेल्या 17 वर्षांपासून देऊन कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा आरोप यशवंत जाधव यांनी केला.  अशा प्रकरणात असणार्‍या संबंधित अधिकार्‍यांची बढती रोखावी अशी मागणीही त्यांनी केली. विरोधी पक्ष नेता रवी राजा, भाजपचे प्रभाकर शिंदे यांनी या घोटाळ्याची तातडीने चौकशी करून दोषी आढळणार्‍या अधिकार्‍यांचे निलंबन करावे अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

‘त्या’ अधिकार्‍यांची बढती रोखली

पालिकेच्या जल विभागातील उप प्रमुख अभियंता संजय जाधव, बाळासाहेब साळवे, अजय राठोर, अरुण भोईर, विवेक मोरे यांची बढती सेवाज्येष्ठतेनुसार प्रमुख अभियंतापदावर करण्याबाबत प्रस्ताव पालिका प्रशासनाने महासभेत मांडला. मात्र यातील अजय राठोर आणि बाबासाहेब साळवे यांनी ‘बीबीटी’मध्ये बेकायदेशीर पाणीपुरवठा केल्याचा आरोप करीत उपसूचना मांडून बढती रोखण्याची मागणी यशवंत जाधव यांनी केली. याला सर्वपक्षीयांनी पाठिंबा दिल्यामुळे संबंधित दोन अधिकार्‍यांची बढती चौकशी अहवाल येईपर्यंत रोखण्यात आली.