
महापालिकेत समावेश झालेल्या सातारा-देवळाई परिसरात पाण्याची अत्यंत भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. या भागातील विहिरी, विंधन विहिरी कोरड्याठाक झाल्या असून, टैंकर आणि जारलादेखील पाणी मिळत नसल्याने झाल्टा फाटा, बाळापूर, परदरी तांडा येथून टँकरद्वारे पाणी आणावे लागत आहे. भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असली तरी मनपा प्रशासनाकडून पर्यायी उपाययोजना राबविली जात नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
सातारा-देवळाई परिसर हा ग्रामपंचायतीचा भाग म्हणून ओळखला जात होता. मार्च 2016 मध्ये महापालिकेत सातारा-देवळाई परिसराचा समावेश झाला. त्यावेळी या भागाची लोकसंख्या 42 हजार इतकी होती. शहरालगतचा भाग म्हणून झपाट्याने विकसित झाला. या आठ वर्षांच्या कार्यकाळात या भागात टोलेजंग इमारती, रोहाऊस, अपार्टमेंट, व्यापारी संकुल आणि वसाहती उभारण्यात आल्या आहेत. या भागाची लोकसंख्या एक ते दीड लाखावर गेली आहे. परंतु, या भागात मुलभूत सुविधांची वाणवा आहे. नवीन पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन टाकण्यात आली आहे. ड्रेनेजलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. विद्युत पुरवठ्याचा खेळखंडोबा झाला असून, अनेक भागाला कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
बाराही महिने जारचे पाणी
सातारा-देवळाई परिसरातील नागरिकांना बाराही महिने जारचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. जारसाठी लागणारे फिल्टर, आरो प्लांन्ट महापालिकेची परवानगी न घेताच सुरू करण्यात आले आहेत. एक जार पाणी 20 रुपयाला विकत घ्यावे लागत आहे. जारसाठी देखील विहिरीतून टँकरचे पाणी मागवले जाते. जारच्या पाण्यावरच बाराही महिने तहान भागवावी लागते. आता विहिरी कोरड्या पडल्याने जारसाठी पाणी मिळावे, याकरिता भटकंती करण्याची वेळ आली आहे.
झाल्टा फाटा, बाळापूर येथून आणतात पाणी
सातारा-देवळाई परिसरातील विहिरी कोरड्याठाक पडल्यामुळे या भागातील टँकर आणि आरो प्लांन्टधारकांना झाल्टा फाटा, बाळापूर येथून टँकरद्वारे पाणी आणावे लागत आहे. आरो प्लांन्टमधील पाण्याचे टिडीएस 45 एवढे कमी ठेवले जात असल्यामुळे पाण्याचे दुष्परिणाम लवकर लक्षात येत नाही. जारच्या पाण्यावर लाखो रुपयांची उलाढाल होत आहे.
टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी
महापालिकेत असूनही या भागातील नागरिकांना टँकरद्वारे विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. मनपाचे टँकर घेण्यासाठी कंत्राटदाराकडे अगोदर पैसे मोजावे लागतात. या भागातील सर्वसामान्य रहिवाशांना आठवड्याला टँकर विकत घेणे परवडत नाही. त्यामुळे या भागात किमान मोफत टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. पाण्यासाठी वारंवार निवेदने देऊनही प्रशासनाकडून कोणतीही पर्यायी उपाययोजना राबविली जात नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
विंधन विहिरींवरच सारी भिस्त
सातारा-देवळाई संपूर्ण परिसर विहीरी आणि विंधन विहीरीच्या पाण्यावरच अवलंबून आहे. घराघरात विंधन विहीरी असल्यामुळे जानेवारीपासूनच पाणीटंचाई जाणवू लागते. बिंधन विहिरीची पाणीपातळी झपाट्याने खालावत जाते. विहिरीतून भरमसाठ उपसा होत असल्याने विहिरींचे पाणीदेखील खोलवर जाते. फेब्रुवारीत टँकरची मागणी वाढत असून, घराघरात टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. टँकरचे पाणी वापरासाठी घ्यावे लागते. सध्या या भागातील विहिरी आणि बिंधन विहीरी कोरड्याठाक पडल्या आहेत. रस्त्यावर दिवस-रात्र टँकरच दिसू लागले आहेत. पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. ऐन उन्हाळ्यात टँकर मागितले तर तीन किंवा चार दिवसांनी मिळत आहे.
पालकमंत्र्यांचेही दुर्लक्ष
पश्चिम विधानसभा मतदारसंघात सातारा-देवळाई परिसराचा समावेश आहे. या मतदारसंघातून सगल चौथ्यांदा मिंधे गटाचे लोकप्रतिनिधी निवडून आले आहेत. भाजपसोबत सत्तेत बसलेल्या मिंधेगटाचे या भागाचे लोकप्रतिनिधी पालकमंत्री झाले आहेत. पालकमंत्र्यांचा मतदारसंघात पाण्याची भीषण परिस्थिती निर्माण झाली असलीतरी त्यांना याचे कोणतेही सोयरसूतक नाही. पाणीटंचाई असतानाही पालकमंत्री म्हणून मतदारसंघातील जनतेसाठी टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा करण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा संताप नागरिकांमधून व्यक्त होत आहे.