नगर जिह्यात 345 टँकरने पाणीपुरवठा सुरू

जिह्यातील पाणीसाठा 20 टक्क्यांच्या खाली आला असून, अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. गावांनी केलेल्या मागणीनुसार तब्बल सव्वासहा लाख नागरिकांना 345 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. टँकरचा आकडा अजून वाढण्याची शक्यता आहे. वेळेत पाऊस सुरू न झाल्यास नगरकरांवर पाणीकपातीचे संकट ओढवण्याची भीती आहे.

सध्या पाणीटंचाईच्या झळा तीव्र झाल्या आहेत. आता राहाता तालुक्यातही टँकर सुरू झाला आहे. श्रीरामपूर व राहुरी वगळता, 12 तालुक्यांतील सहा लाख 39 हजार 175 नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. पाथर्डी तालुक्यात सर्वाधिक 105 टँकर सुरू आहेत. दरवर्षी एप्रिल व मे महिन्यांत संगमनेर, नगर, पारनेर व पाथर्डी तालुक्यांतील काही गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढलेली दिसत आहेत. आजमितीस श्रीरामपूर व राहुरी तालुके वगळता, सर्वच तालुक्यांत टँकर सुरू आहेत.

पाथर्डी तालुक्यातील 87 गावे आणि 455 वाडय़ांत पाणी परिस्थिती गंभीर आहे. त्याखालोखाल पारनेर, कर्जत, संगमनेर तालुक्यांत पाणीटंचाई तीव्र आहे. पावसाळा लांबल्यास टंचाईग्रस्त गावांची संख्या अधिक वाढण्याची शयता आहे. सध्या पाथर्डी, कर्जत, पारनेर, श्रीगोंदा व शेवगाव या नगरपालिका व नगरपंचायतींनादेखील पाणीटंचाईचे चटके बसले आहेत. कर्जत नगरपालिकेत 11, तर पाथर्डी नगरपालिकाक्षेत्रात सहा टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. या पाच नगरपालिकाक्षेत्रांसह जिह्यातील 333 गावे आणि एक हजार 769 वाडय़ांत पाणीटंचाई निर्माण झालेली आहे. त्यामुळे या गावांतील सहा लाख 39 हजार 175 लोकसंख्येला 345 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.

तालुकानिहाय टँकरची संख्या ः संगमनेर 28, अकोले 6, कोपरगाव  7, नेवासा 5, राहाता 1, नगर 33, पारनेर 39, पाथर्डी 111, शेवगाव 17, कर्जत 52, जामखेड 26, श्रीगोंदा 20.