
जलवाहिनीच्या कामासाठी मुंबई शहरातील ‘ए’, ‘बी’ आणि ‘ई’ विभागातील काही परिसरांचा पाणीपुरवठा बुधवार, 28 मे रोजी सकाळी 10 ते गुरुवार 29 मे रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत 24 तासांसाठी बंद राहणार आहे, तर काही भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.
पालिकेतर्फे ‘ई’ विभागातील पाणीपुरवठा सुव्यवस्थित करण्याकरिता नवीन कामे हाती घेतली आहेत. याअंतर्गत नवानगर, डॉकयार्ड मार्ग येथील जुनी 1200 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी बंद करून, नवीन 1200 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी कार्यान्वित करण्यात येणार आहे. तसेच भंडारवाडा जलाशयाचा कप्पा – 1 वरील 900 मिलीमीटर व्यासाचे जुने जलद्वार काढून नवीन 900 मिलीमीटर व्यासाचे जलद्वार बसविण्यात येणार आहे. ही कामे बुधवारी आणि गुरुवारी पूर्ण करण्यात येणार आहेत. या कालावधीमध्ये ‘ए’, ‘बी’ व ‘ई’ विभागांतील काही भागात पाणीपुरवठा पूर्णतः बंद, तर काही भागात अंशतः बंद राहील.
ए विभाग ः सेंट जॉर्ज रुग्णालय, पी. डिमेलो मार्ग, रामगड झोपडपट्टी रिझर्व्ह बँक, नेव्हल डॉकयार्ड, शहीद भगतसिंग मार्ग, जीपीओ जंक्शनपासून रिगल चित्रपटगृहापर्यंत बुधवारी पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहील.
बी विभाग ः मोहम्मद अली मार्ग, इब्राहिम रहिमत्तुला मार्ग, इमामवाडा मार्ग, नाकोडा, कोलसा, डोंगरी, धोबी शेरिफ देवजी, रघुनाथ महाराज, ओल्ड बंगालीपुरा भंडारी, नूरबाग, केशवजी नाईक मार्ग, नरसी नाथा स्ट्रीट येथे गुरुवारी पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहील. उमरखाडी, चिंचबंदर, कारागृह मार्ग, डॉ. महेश्वरी मार्ग, मुंबई पोर्ट ट्रस्ट परिक्षेत्र येथे बुधवारी पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहील.
ई विभाग ः नेसबीट परिक्षेत्र – ना. म. जोशी मार्ग, नागपाडा, एम. ए. मार्ग, टँक पाखाडी मार्ग, भायखळा (पश्चिम)येथे गुरुवारी पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहील. मुंबई सेंट्रल, कामाठीपुरा, आग्रीपाडा येथे गुरुवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. खांडिया स्ट्रीट, टेमकर स्ट्रीट, जे. जे. मार्ग येथे गुरुवारी पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहील. काळाचौकी, चिंचपोकळी, टी. बी. कदम मार्ग येथे गुरुवारी कमी दाबाने पाणीपुरवठा राहील.