
सामना प्रतिनिधी । सटाणा
सटाणा शहराला पाणीपुरवठा करणार्या गिरणा नदीपात्र कोरडेठाक झाल्याने सटाणा शहराला पाच दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय पाणीपुरवठा विभागाने घेतला असला तरीही शहरात तब्बल अकरा दिवसाआड पाणीपुरवठा होत असून तो देखील अत्यंत तोकड्या स्वरूपाचा होत आहे. नजीकच्या काळात कोणतेही पाण्याचे आवर्तन नसल्याने मार्च महिना संपूर्ण पााणीबाणी होण्याची भिती शहरात व्यक्त होवू लागली आहे.
सटाणा शहरात गेल्या महिनाभरापासून तीव्र पाणी टंचाई असल्याने प्रेबुवारीच्या महिन्याच्या प्रारंभीच चणकापूरचे आवर्तन सोडण्यात आले होते. यामुळे या काळात शहरात एक दिवस आड मुबलक पाणी पुरवठा करण्यात सुरूवातीला पंधरा दिवस सटाणा पालिका प्रशासनाला शक्य झाले. त्याच काळात आरम नदीला देखील केळझरचे आवर्तन सोडण्यात आल्याने शहरात सर्वत्र पाणीच पाणी दिसू लागले होते.
चणकापूरचे आवर्तन असतांना केळझरचे आवर्तन सोडणे उचित नसतांना देखील शासनाने तुघलकी निर्णय घेवून शहरात एकाच वेळी दोघा नदीपात्रात पाणी सोडल्याने मार्च महिन्यात सटाण्यात पाणीटंचाईची तीव्रता जाणवणार हे सांगण्यासाठी कोणत्याही भविष्यवेत्त्याची गरज भासली नाही. आणि अगदी तीच परिस्थिती निर्माण झाली आहे.
शहराला केळझर व चणकापूर असे दोघेही आवर्तन सोडल्याने आता मार्च महिनाभर कोणतेही आवर्तन सुटणार नसल्याची माहिती उपलब्ध होत आहे. यामुळे शहराला तीव्र पाणीटंचाईला सामोरे जाण्याची भिती व्यक्त होवू लागली आहे. यामुळे नजीकच्या काळात लवकरच शहरात पाण्याचे टँकर्स धावणार असून पाण्याचे भाव देखील वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
































































